मे मध्ये होणार भूमी अभिलेख विभागाची परीक्षा; 1020 पदांची होणार भरती

पुणे: गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली भूमी अभिलेख विभागाची विविध पदांची परीक्षा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असल्याची माहिती या विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली. शासनाच्या आदेशानुसार ही परीक्षा आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) संस्था घेणार आहे. लवकरच टीसीएसचे अधिकारी आणि भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होऊन परीक्षेच्या तारखेवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

भूमी अभिलेख विभागाकडून अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या विभागांकरीता सुमारे एक हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. पदभरतीसाठी पुणे विभागात 163, कोकण प्रदेश-मुंबई 244, नाशिक 102, औरंगाबाद 207, अमरावती 108 आणि नागपूर विभागात 189 जागा आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात होणार्‍या या परीक्षेसाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. मात्र, म्हाडाच्या ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून भूमी अभिलेखची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क नाही: याबाबत भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, भूमी अभिलेख विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती करण्यात येणार आहे. आता टीसीएस कंपनीची परीक्षा घेण्यासाठी निवड करण्यात आली आहे. आठ दिवसांत कंपनीसोबत बैठक होऊन मे अखेरीस परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. परीक्षा घेणारी कंपनी बदलली असली, तरी विद्यार्थ्यांकडून आता कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. टीसीएस कंपनीला त्यांच्या कामाचे पैसे राज्य शासनाकडून अदा केले जातील.

तब्बल 76 हजार अर्जांपैकी 46 हजार 800 अर्ज वैध: 1020 पदांसाठी तब्बल 76 हजार अर्ज आले होते. त्यापैकी 46 हजार 800 अर्ज वैध ठरले आहेत. संबंधित उमेदवारांचे पैसै ऑनलाइन पद्धतीने पुन्हा थेट बँक खात्याच जमा करण्यात येत आहेत. भरती झाल्यानंतर प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, निवड झालेले उमेदवार रुजू न झाल्यास प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संगणकीकृत विदा पोलिसांनी जमा केल्याने भूमी अभिलेख विभागाच्या परीक्षेसाठी मागविण्यात आलेल्या अर्जांची माहिती देखील पोलिसांकडे गेली.

जमाबंदी आयुक्तांची टीम तयार करणार प्रश्नपत्रिका: विविध शासकीय विभागांच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाच्या परीक्षेसाठी जमाबंदी आयुक्त के. सुधांशू यांच्या टीमकडून प्रश्नपत्रिका तयार केली जाणार आहे. ही प्रश्नपत्रिका उमेदवारांना ऑनलाइन लॉगइन केल्यानंतर थेट संगणकावरच दिसणार आहे. टीसीएसच्या कोणत्याही अधिकारी, कर्मचार्‍याला ही प्रश्नपत्रिका दिसणार नाही, असेही रायते यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *