छत्रपती संभाजीनगर: शासनाचे १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनीने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीने (यशदा) प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. हा सन्मान भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनीचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय विर यांनी स्वीकारला.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक पुणे कार्यालयातील उपसंचालक संलग्न कमलाकर हट्टेकर हे छत्रपती संभाजीनगर येथील दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रशिक्षण प्रबोधिनीची पाहणी करून प्रभारी प्राचार्य डॉ. विजय विर यांना सूचना केल्या होत्या. प्राचार्य विर यांनी त्याअनुषंगाने प्रबोधिनीतील पुरूष वसतिगृह आणि मुख्य इमारतीमध्ये दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरचे उपसंचालक किशोर जाधव यांनी जमाबंदी आयुक्त यांच्याकडे सादर केला होता. त्यासाठी निधी मंजूर झाल्याने प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थींना गरम पाणी, पिण्यासाठी आरओचे शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच इमारतीची रंगरंगोटी, परिसरात पेव्हर ब्लॉक अशा सुविधा करण्यात आल्या. या उल्लेखनीय कार्यामुळे प्रशिक्षण प्रबोधिनीचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय विर यांना यशदाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
उपसंचालक, प्राचार्यांचे स्वागत
दरम्यान, या उल्लेखनीय कार्याबद्दल छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपसंचालक किशोर जाधव व प्रशिक्षण प्रबोधिनीचे प्राचार्य डॉ. विजय विर यांचे भूमी अभिलेख कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य सरचिटणीस आर. एम. कांबळे यांनी स्वागत केले. तसेच कर्मचारी संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी अनिल रूपेकर, गणेश आर्दड, विकास पुंड आदी उपस्थित होते.