औरंगाबाद: सर्वांच्या प्रयत्नातून ‘टीम वर्क‘मुळे वार्षिक परीक्षा यशस्वीपणे घेता आल्या. त्याचप्रमाणे आगामी काळात देखील सामूहिक प्रयत्नातून विद्यापीठाला पुढे नेऊ, असा विश्वास कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र कुलगुरुपदाची सूत्रे प्राचार्य डॉ.शाम शिरसाठ यांनी स्वीकारली तर प्रभारी प्र कुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते यांचा सेवागौरव समारंभ झाला. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. महात्मा फुले सभागृहात गुरुवारी (दि.२९) हा कार्यक्रम झाला. यावेळी कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांच्यासह विविध अधिकारी मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले, कोणताही व्यक्ती केवळ पदाने मोठी होत नसतो तर कर्तृत्वाने मोठा होतो. डॉ.प्रवीण वक्ते यांनी अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे त्यांचा पुढील काळ उज्ज्वल राहील तर डॉ.श्याम शिरसाठ हे याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, प्राध्यापक राहिलेले आहेत. त्यामुळे प्र कुलगुरुपदावर त्यांची झालेली निवड ते सार्थ ठरवतील, असेही कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले.
कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे, डॉ.राजेश करपे, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.हरिदास विधाते, डॉ.फुलचंद सलामपुरे, डॉ.राहुल मस्के, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.चेतना सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर भगवान फड यांनी आभार मानले.