प्रतिकात्मक छायाचित्र
पुणे: प्रतिबंधित क्षेत्र व त्यालगतच्या पाचशे मीटर क्षेत्रातील सर्व प्रकारच्या दारूची दुकाने (अबकारी अनुज्ञप्त्या) बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी मद्यविक्रीच्या दुकानांबाबत एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे व निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार मद्यनिर्माण्या (मायक्रोब्रेवरी वगळता) मद्याचे घाऊक, ठोक विक्रेते व किरकोळ मद्यविक्रीच्या दुकानांचे व्यवहार सुरु करण्याबाबत अटी व शर्तीसह परवानगी दिलेली आहे.
प्रतिबंधित क्षेत्र वगळून मद्यनिर्माण्या (मायक्रोब्रंवरी वगळता) मद्याचे घाऊक, ठोक विक्रेते व किरकोळ मद्यविक्रीच्या दुकानांचे व्यवहार सुरु करण्याबाबत अटी व शर्तीसह परवानगी दिलेली आहे. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील ग्राहक लगतच्या मद्यविक्रीच्या दुकानांमध्ये येवून गर्दी वाढवत आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रामधील कोरोना या विषाणूचा प्रसार लगतच्या अन्य क्षेत्रामध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साथ नियंत्रण कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये कलम 30 (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार या आदेशामध्ये अंशत: बदल करुन प्रतिबंधित क्षेत्र व त्यालगतच्या पाचशे मीटर क्षेत्रातील सर्व प्रकारच्या अबकारी अनुज्ञप्त्या बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
अटी, शर्ती व मार्गदर्शक तत्त्वांचा भंग झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 अन्वये तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केला जाईल, याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.