औरंगाबाद: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद शहरामध्ये बुधवार, 20 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत.
औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गुरूवारी मध्यरात्रीपासून रविवार, 17 मे मध्यरात्रीपर्यंत शहरात सलग तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा लाॅकडाऊन महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी जाहीर केला होता. याची मुदत संपण्यापूर्वीच आता यामधे 20 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
शहरात पोलिस प्रशासनाकडून कन्टेन्मेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कन्टेन्मेंट झोनमधून नागरिकांचे बाहेरील भागात तसेच बाहेरील भागातील नागरिकांचे कन्टेन्मेंट झोनमध्ये होणारी हालचाल बुधवारपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात कन्टेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देत नागरिकांनीही सहकार्य करून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.