# बीड जिल्ह्यात लॉकडाऊन मध्ये सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत सूट.

मुंबई :  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊन मध्ये वाढीव सूट देण्याबाबत घोषणा केली असून, जिल्हावासीयांच्या मागणीनुसार सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत लॉकडाऊन शिथिल करण्यासह सर्व प्रकारच्या व्यापारास परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत.

बीड जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन सुरू असून, या लॉकडाऊनच्या वेळांमध्ये शिथीलता देण्याबाबत विविध व्यापारी संघटना, व्यावसायिक, तसेच काही पत्रकारांनी मागणी केली होती. धनंजय मुंडे हे स्वतः सध्या कोविड-१९ पॉझिटिव्ह असून मुंबई येथे उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच विविध व्यापारी संघटानांनी विविध मार्गांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे कडे लॉकडाऊन मध्ये शिथिलता देऊन व्यावसायिकांना वेळ वाढवून देणेबाबत मागणी केली होती. लॉकडाऊन च्या काळात अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना व हातावर रोजगार असणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

कोविड उपचारार्थ रुगणालायत दाखल असलेल्या धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील विविध घटकांच्या भावना लक्षात घेत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना उद्या (दि. ३०) मंगळवार पासून लॉकडाऊन मध्ये सकाळी ७ ते १ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या व्यवसायांना मुभा देण्याबाबत निर्देश दिले आहेत.

लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी या वेळात करोना विषयक नियमांचे काटेकोर पालन करावे मास्क, सोशल डिस्टन्स पाळावे असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *