# इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनची सुविधा देणारे महाराष्ट्र चेंबर राज्यातील पहिले -उद्योगमंत्री सुभाष देसाई.

नाशिक:  इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनची सुविधा देणारे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चर हे राज्यातील पहिलेच चेंबर आहे. डिजिटल क्षेत्रात महाराष्ट्र चेंबरने दमदार पाऊल पुढे टाकले आहे. यामुळे इज ऑफ डुईंग बिझनेसचा मानस नक्कीच वाढणार आहे. यामुळे गुणवत्ता अधिक मजबूत झाली आहे. राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला  आहे.

सध्याच्या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करून कामकाज सुरु आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत हा मोठा विजय आहे. या सुविधेमुळे वेळ, पैसा वाचणार असून कार्यक्षमता वाढणार आहे. जसे जन्माचा दाखला तसेच  आयात निर्यात करण्यासाठी सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन  हे महत्वाचे कागदपत्र आहे.  महाराष्ट्र चेंबरने इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनची सुविधा सुरु केल्याबद्दल महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, विश्वस्त आशिष पेडणेकर आणि  टीमचे  कौतुक व अभिनंदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अॅग्रिकल्चरच्या शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी आयोजित  इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनच्या सुविधा मंचाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सुभाष देसाई म्हणाले की, कोरोना महामारीमुळे अडचणी अनेक आहेत मात्र शो मस्ट गो ऑन अर्थचक्र फिरले पाहिजे त्यासाठी राज्यसरकाने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. उद्योगांसाठी आवश्यक परवाने कमी केले असून परवाने झटपट देण्यात येत आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरुद्ध लढाईसाठी चांगली रचना केली आहे. चांगल्या सुविधा निर्माण केल्या, रुग्णालये उभी केली, सर्व यंत्रणा दिवसरात्र कामाला लागली आहे. आता अनलॉककडे प्रवास सुरु झाला आहे. देशात उद्योग सुरु करण्यास महाराष्ट्र सरकारने पहिले पाऊल उचलले आहे. २० लाख कामगार कामावर रुजू झाले आहेत. बाजारपेठा सुरु झाल्या आहेत. देशातील परदेशी गुंतवणुकीपैकी ३३ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होते. राज्यात परदेशी व देशी गुंतवणूक वाढावी यासाठी सरकारने नवीन योजना सुरु केल्या आहेत.  महापरवाना, महाजॉब, उद्योगमित्र, नवीन औद्योगिक क्षेत्राची निर्मिती सरकारने ४ योजना सुरु केल्या आहेत. याबाबत माहिती देतांना महापरवानामध्ये ४८ तासात नवीन उद्योगांना परवानगी देण्यात येत आहे. महाजॉबमध्ये आतापर्यंत १० हजार उद्योगांनी नोंदणी केली असून २ लाख तरुणांनी नोंदणी केली आहे. काम देणारा आणि काम मागणारा दोघांची इथे नोंदणी होते त्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळेल. उद्योगमित्रमध्ये एक अधिकारी आम्ही नेमला असून उद्योगांना गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून दिला आहे. नवीन औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यात येत आहे रायगड येथे सुरवात झाली आहे. गुगल, अमेझॉन यासारख्या अनेक मोठ्या कंपन्या संपर्कात आहेत. सौर ऊर्जा उद्योगाबरोबर करार केले आहेत. केवळ करार केले नसून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काम सुरु असल्याचे  उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी सर्वांचे स्वागत केले. कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर सर्वच बंद झाले होते. मात्र, महाराष्ट्र चेंबरने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यापार उद्योग सुरु ठेवण्यासाठी ऑनलाईन सेमिनार, चर्चासत्र, आमदार, खासदार, मंत्री महोदय यांच्या समवेत अडचणींसंदर्भात बैठकी आयोजित केल्या. तसेच आयात निर्यातीसाठी आवश्यक  सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनची सुविधा उद्योगांना घरून दिली.  याच पार्श्वभूमीवर उद्योगांना इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन  देण्यासाठी प्रयत्न सुरु केले व आज ते प्रत्यक्षात आले. राज्याचे कोरोनामुळे टाळेबंदीच्या काळातही  अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी चेंबरने प्रयत्न केले. चेंबरने नेहमीच व्यापार उद्योग वाढावा यासाठी प्रयत्न केले आहेत आणि सरकार व व्यापारी उद्योजकांच्या पाठीशी उभे राहून राज्यातील उद्योगांची देशात व  जागतिक स्तरावर ओळख व बाजारपेठ निर्माण करून देण्यात यशस्वी झाले असल्याचे संतोष  मंडलेचा म्हणाले.

महाराष्ट्र चेंबरचे विश्वस्त आशिष पेडणेकर म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट ऑफ ओरिजिनची सुविधा प्रत्यक्षात आल्याने आनंद होत आहे. अनेक संघटना यासाठी प्रयत्न करत होत्या. या सुविधेमुळे राज्यातील कुठल्याही भागातून उद्योगांना सहजरित्या  इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन घेता येईल याचा आनंद आहे. परदेशी गुंतवणूक वाढावी यासाठी सरकारची भूमिका नेहमीच सहकाऱ्यांची असते. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे नेहमीच चांगले सहकार्य करत असतात व व्यापार उद्योग वाढीसाठी व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी चेंबरला सहकार्य करत असल्याचे श्री. पेडणेकर म्हणाले.

यावेळी काळे लॉजिस्टिकच्या सहकार्याने या सुविधेची सुरवात महाराष्ट्र चेंबरने केली असून त्याबाबतची माहिती व कार्यपद्धती चित्रफितीद्वारे काळे लॉजिस्टिकचे सीइओ अमोल मोरे यांनी दिली.  आभारप्रदर्शन महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केले. सूत्रसंचालन सरकार्यवाह सागर नागरे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमास  महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, उमेश दाशरथी, उपाध्यक्ष सौ. शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, नाशिक शाखेचे चेअरमन संजय दादलिका, माजी उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, समीर दुधगांवकर, सोलापूर चेंबरचे अध्यक्ष राजू राठी, अमरावती चेंबरचे अध्यक्ष विनोद कलंत्री, सचिव चंद्रकांत दीक्षित, विनी दत्ता यांच्यासह व्यापारी उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *