# ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये महाराष्ट्राची मोहोर; दुसऱ्या क्रमांकाचा ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’चा पुरस्कार.

लहान शहरांच्या श्रेणीत कराड, सासवड आणि लोणावळा शहराला देशातील पहिले तीनही क्रमांक

नवी दिल्ली: ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२०’ मध्ये महाराष्ट्राने ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे. मोठ्या शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई देशातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले तर लहान शहरांच्या श्रेणीत कराड, सासवड आणि लोणावळा शहराने देशातील पहिले तीनही क्रमांक पटकाविले आहेत. आज राज्याने एकूण १७ पुरस्कार मिळविले आहेत.

सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक महाराष्ट्राला मिळाले आहेत. महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत (नागरी) सन 2018, 2019 आणि 2020 सलग तीनही वर्षी देशात सर्वाधिक पुरस्कार राज्याला मिळाले आहेत. राष्ट्रीय पातळीवर राज्याचे कौतुक होत आहे. अमृत शहरांच्या स्वच्छ श्रेणीमध्ये राष्ट्रीयस्तरावरील 100 अव्वल अमृत शहरांपैकी महाराष्ट्रातील ४3 पैकी 31 शहरांचा समावेश आहे. राज्यातील 75 टक्के अमृत शहरे पहिल्या 100 शहरांमध्ये आली आहेत. 25 नॉन अमृत शहरांपैकी 20 महाराष्ट्रातील आहेत. कचरामुक्त राष्ट्रीय तारांकित 141 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 77 शहरांचा समावेश आहे. संपूर्ण राज्य हागणदारी मुक्त असून राज्यातील 216 शहरे ओडीएफ प्लस तर 116 शहरे ओडीएफ प्लस प्लस झाली आहेत.

2018 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील 46 पुरस्कारांपैकी सर्वाधिक 10 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले होते. पहिल्या 100 अमृत शहरांमध्ये राज्यातील 27 अमृत शहरांचा सहभाग होता.

स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देखील राज्याने सर्वोत्तम कामगिरीचा तृतीय क्रमांक मिळविला होता. त्याचबरोबर देशात सर्वाधिक 46 पुरस्कार राज्याने मिळविले होते. पहिल्या 100 अमृत शहरांमध्ये यावर्षी राज्यातील 29 अमृत शहरांचा सहभाग होता. कचरामुक्त शहरांच्या तारांकित मानांकनामध्ये देशपातळीवर 53 शहरांना तीन स्टार मानांकन प्राप्त झाले होते त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे 27 शहरं महाराष्ट्रातील होती. याचवर्षी देशातील 500 शहरांनी ओडीएफ प्लस आणि ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त केला यात महाराष्ट्रातील 154 शहरांचा समावेश होता.

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास  हरदीपसिंग पुरी  यांच्या उपस्थितीत व्हर्च्युअल पध्दतीने आज ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-2020’ चे निकाल घोषित करण्यात आले. यावेळी विविध श्रेणींमध्ये एकूण 129  पुरस्कार व्हर्च्युअल पध्दतीने प्रदान करण्यात आले महाराष्ट्राला यात एकूण 17 पुरस्कार मिळाले. केंद्रीय शहरी विकास विभागाचे सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा आणि महाराष्ट्राच्यावतीने नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, नगर विकास विभागाच्या तत्कालिन प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव महेश पाठक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री पुरी यांनी श्री शिंदे यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्राला ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’चा दुसऱ्या क्रमांकाचा मान:

100 नागरी स्थानिक स्वराज संस्थांपेक्षा जास्त संख्या असलेल्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राने 2895.29 गुण मिळवून देशात दुसरा क्रमांक मिळविला. एकूण 11 राज्य या श्रेणीत निवडण्यात आली. मागील वर्षी या श्रेणीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर होता.

नवी मुंबईला ‘पंचताराकिंत’ शहराचा दर्जा:

देशभरातील घनकचरा मुक्त शहरांच्या पंचताराकिंत वर्गवारीत देशभरातील एकूण 6 शहरांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबईचा समावेश आहे. याव्यतीरिक्त इंदोर, अंबिकापूर, सूरत, राजकोट, मैसुर ही शहरे आहेत. 86 शहरे 3 स्टार, आणि 64  शहरे 1 स्टार आहेत.

एक लाख पेक्षा जास्त लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमध्ये राज्यातील 4 शहर

एक लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील  टॉप 25 स्वच्छ शहर निवडण्यात आली असून राज्यातील 4 शहरांचा यात समावेश आहे. या श्रेणीमधील पहिल्या तीन शहारांमध्ये नवी मुंबईने देशात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या श्रेणीत चंद्रपूर (9),  धुळे (18)  आणि नाशिक (25) या शहारांचा समावेश आहे.

एक लाख पेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमध्ये पहिले तीन पुरस्कार महाराष्ट्राला पहिल्या 25 शहरांमध्ये राज्यातील 20 शहरं

राज्याने एक लाख पेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील एकूण रँकींगमध्ये बाजी मारली असून या श्रेणीत देशात पहिले तिनही पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले आहेत. यामध्ये कराड शहराने  पहिला, सासवड शहराने दुसरा तर लोणावळा शहराने  तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळविला.

या तीन शहरांसह या श्रेणीत देशातील पहिल्या टॉप 25 शहरांमध्ये राज्यातील 17 शहरांचा समावेश आहे.  यात पन्हाळा(5), जेजुरी(6), शिर्डी(7), मौदा(8), कागल(9), रत्नागिरी(10), ब्रह्मपुरी(11), वडगाव (12), गडहिंगलज(13), इंदापूर(14), देवळाली प्रवरा(15), राजापूर (16), वीटा (17), मुरगुड(18), नरखेड(23), माथेरान(24) आणि मलकापूर (25) या शहारांचा समावेश आहे.

देहूरोड कँटॉनमेंट ठरले सर्वोत्तम:

देशातील एकूण 8 स्वच्‍छ कँटॉनमेंट बोर्डांना आज पुरस्कार देण्यात आला यात महाराष्ट्रातून देहूरोड कँटॉनमेंटने पहिला क्रमांक पटकाविला आहे. 6 कँटॉनमेंट बोर्डांना पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार विभागून मिळाला आहे. देशातील एकूण 62 कँटाँनमेंट बोर्डना स्वच्छता रँकींग देण्यात आली असून महाराष्ट्रातील 6 कँटॉनमेंट बोर्डचा यात समावेश आहे. यात देहूरोड  कँट(8), अहमदनगर (12), खडकी (15), पुणे (25), औरंगाबाद (29) आणि देवळाली (52) असा क्रम आहे.

पश्चिम विभागात राज्यातील 11 शहारांनी मारली बाजी:

देशातील पश्चिम विभागातील राज्यांमधील लोकसंख्या निहाय तीन श्रेणींमध्ये 15 शहारांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील सर्वाधिक 11 शहरांचा समावेश आहे.

पश्चिम विभागातील राज्यांमधील 50 हजार ते एक लाख लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमधून 5 शहरांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील 4 शहरांनी वेगवेगळ्या श्रेणीत पहिला क्रमांक पटकाविला आहे. यात हिंगोली, बल्लारपूर, रत्नागिरी आणि शेगाव नगर परिषदांचा समावेश आहे.

याच विभागातील राज्यांमधील 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमधून 5 शहरांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील 4 शहरांना वेगवेगळ्या श्रेणीत प्रथम क्रमांकांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात वीटा, इंदापूर, शिर्डी आणि वरोरा नगर परिषदांचा समावेश आहे.

पश्चिम विभागातील राज्यांमधील 25 हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहरांमधून 5 शहरांना सन्मानित करण्यात आले असून यात राज्यातील 3 शहरांनी वेगवेगळ्या श्रेणीत पहिला क्रमांक पटकाविला आहे . यात अकोले, जेजुरी आणि पन्हाळा नगर परिषदांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *