# कोरोनाविरुद्ध लढाईतील प्रकाशऊर्जा: महावितरण.

 

अवघ्या जगाला व्यापून टाकणारा कोरोना विषाणू म्हणजेच कोविड-19 या संसर्गजन्य आजाराची लढाई आता निर्णायक टप्प्यात आली आहे. प्रत्येक घरातून, प्रत्येक देशात ही लढाई सुरु आहे. या लढाईचे नेतृत्व वैद्यकीय क्षेत्राकडे असल्यामुळे त्यांना पूरक सेवा देणारे अनेक क्षेत्र अत्यावश्यक सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यापैकी एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे वीज क्षेत्र. आपले कर्तव्य चोखपणे बजावत कोरोनाविरोधात झुंज देणारे कोवीड योद्धा असोत किंवा लॉकडाऊनमुळे घरीच राहणारे नागरिक किंवा घरूनच काम करणारे (वर्क फ्रॉम होम) सर्व क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांना सध्या गरज आहे ती अखंडित वीजपुरवठ्याची. ही सेवा देण्यासाठी महावितरणचे सुमारे 40 हजार अभियंते, तांत्रिक कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत.

एरव्ही आणि आता प्रामुख्याने कोरोना विरुद्धच्या लढाईत वीजसेवा अत्यावश्यकच आहे. मात्र, वीजपुरवठ्याची प्रक्रिया ही संपूर्णतः तांत्रिक स्वरुपाची आहे. विजेच्या एका बटणामागे शेकडो किलोमीटर पसरलेल्या अजस्त्र वीजयंत्रणेची माहिती किंवा जाणीव नसणे तशी स्वाभाविक बाब आहे. या उघड्यावरील वीजयंत्रणेवर उन्हाचा, वादळाचा, पावसाचा आदींचा परिणाम होत असतो.  अशा स्थितीतही वीजयंत्रणेवर तांत्रिक नियंत्रण ठेऊन सुरळीत वीजपुरवठ्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असणारे महावितरणमधील अभियंता व कर्मचाऱ्यांच्या कामाचे मोल खंडित वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतरच येते. विचार करा, की ज्या कालावधीत विजेची मोठी टंचाई, अतिभारित वीजयंत्रणा आणि विजेचे भारनियमन सुरु असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असता तर… कल्पनाही करवत नाही ना!  त्यावेळच्या कालावधीत कोरोनाविरुद्ध प्रखर झुंज देणे सोडा, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांना घरात बसून राहणे देखील मुश्कील झाले असते. मात्र, आता अशी कोणतीही परिस्थिती नाही. मुबलक वीज आहे. सक्षम वीजयंत्रणा आहे आणि महत्वाचे म्हणजे शहरी व ग्रामीण भागातही विजेचे भारनियमन देखील पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात वीजपुरवठा सुरळीत असल्याने विजेअभावी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कोणताही व्यत्यय नाही किंवा घरी राहणाऱ्या नागरिकांना आणि घरूनच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरळीत विजेमुळे कोणतीही अडचण नाही.

सुरळीत वीजपुरवठ्यामध्ये इतर अडचण नसली तरी महावितरणच्या राज्यभरातील अभियंते व कर्मचाऱ्यांसाठी उन्हाळ्याचे दिवस तसे अडचणीचे आहेत. साधारणतः मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव सुरु झाला. उन्हामुळे तापलेल्या वीजयंत्रणेवर पावसाचे दोन-तीन टपोरे थेंब पडले तरी पीन किंवा पोस्ट इन्सूलेटर फूटून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. एप्रिल-मे मधील वादळ, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे झाडे, झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळतात. वीजयंत्रणा जमीनदोस्त होते. विविध कामांसाठी झालेल्या खोदकामांमुळे महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्यांना तडा गेलेला असतो. पावसाचे पाणी त्यात गेले की वीजवाहिन्या नादुरुस्त होतात व वीजपुरवठा खंडित होतो. उपकेंद्रातील पॉवर ट्रॉन्सफॉर्मर नादुरुस्त होणे, पेट घेणे आदी प्रकारही होतात.

अशा खडतर परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूने महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांची परीक्षा घेतली आहे. गेल्या दीड महिन्यात राज्यामध्ये सर्वदूर भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. वादळामुळे राज्यात हजारो वीजखांब वीजवाहिन्यांसह कोसळले आहेत. लॉकडाऊनमुळे मर्यादित मनुष्यबळ उपलब्ध असताना अक्षरशः रात्रंदिवस काम करीत महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी वीजयंत्रणेची मोठी हानी झाली असताना विक्रमी वेळेत वीजपुरवठा सुरळीत केला आहे. वीजयंत्रणेच्या दुरुस्ती कामासाठी गेलेले अभियंते व कर्मचारी 25 ते 30 तासांनंतर वीजयंत्रणेची संपूर्ण दुरुस्ती करूनच घरी परतले आहेत. लॉकडाऊनमुळे कोणतीही सोय न झाल्याने उपाशी राहून हे काम त्यांनी पूर्ण केले आहे. अगदी सातारा जिल्ह्यातील सद्याद्री डोंगरदऱ्यातील अतिदुर्गम बामणोली खोऱ्यात वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम असो किंवा शिरुर (जि. पुणे) तालुक्यातील 24 टनी पॉवर ट्रॉन्सफॉर्मर 24 तासांत बदलण्याचे अचाट कामही महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

खरे पाहिले तर वीज हे क्षेत्र इतर अत्यावश्यक सेवेतील सर्वच क्षेत्रांसाठी अत्यंत अत्यावश्यक आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत वैद्यकीय, पोलीस, महसूल, आरोग्य आदी अनेक शासकीय विभाग झुंज देत आहेत. शासनाचाच एक भाग असलेले महावितरणचे अभियंते व कर्मचारी देखील वीजपुरवठा सुरळीत ठेऊन या विभागांना ऊर्जा देत आहेत. ही जाणीव ठेवून पुणे येथील ससून रुग्णालयाच्या नवीन 11 मजली इमारतीला केवळ 36 तासांना 604 केडब्लू वीजभाराची नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणने केली आहे.

अस्मानी किंवा इतर कोणत्याही तांत्रिक बिघाडांच्या संकटामुळे वीजपुरवठा विस्कळीत होण्याचा धोका असताना महावितरणचे प्रकाशदूत अनेक धोके पत्करून सुरळीत वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी कर्तव्य तत्पर आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामध्ये स्वतःच्या अडचणी दूर सारून, एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी काम करीत आहेत. या प्रकाशदूतांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सर्वसामान्यांच्या घरी ज्या अडचणी आहेत, त्याच अडचणी प्रकाशदूतांच्याही घरी आहेत. मात्र, या सर्व अडचणींपेक्षा त्यांना जाणीव आहे एकाच कर्तव्याची. सुरळीत वीजपुरवठ्याची. कोरोनावर यशस्वी मात करण्यासाठी लढणाऱ्या विविध यंत्रणांना व त्यासाठी सहकार्य करणाऱ्या नागरिकांना प्रकाशाची ऊर्जा देण्यासाठी महावितरणचे 40 हजार प्रकाशदूत कोवीड-19 विरुद्धच्या लढाईत खडतर आव्हानांना सामोरे जात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी भक्कमपणे सज्ज आहेत.

–निशिकांत राऊत, पुणे
(लेखक महावितरण पुणे येथे जनसंपर्क अधिकारी आहेत.)
मोबाईल: 7875762055

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *