पुणे: ‘माळेवाडी आयकॉन्स’ जरा वेगळा शब्द मात्र, प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा, सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सांगवी गावामधील एका मोठ्या वस्तीचे नाव ‘माळेवाडी’ याच नावाने तीन वर्षापूर्वी (सन 2018) मित्रांनी एकत्र येऊन ‘माळेवाडी आयकॉन्स’ हा व्हॉटस् अप ग्रुप सुरू केला. उद्देश एकदम मस्त. गावाकडील मित्रमंडळी व्यवसाय आणि नोकरी निमित्त पुण्यामुंबईत स्थायिक झाले आहेत. त्यांना गावाकडे नवीन काय सामाजिक काम काय सुरू आहेत. कोणते नवीन बदल घडत आहेत. याची माहिती व्हावी यासाठी हा ग्रुप सुरू केला. या ग्रुपमध्ये केवळ आणि केवळ माळेवाडीतीलच तरूण, ज्येष्ठ, समवयस्क असे सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे.
ग्रुप सुरू झाला. मग काय इतर ग्रुपवर सुरू असलेले गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि इतर ठिकाणाहून फारवर्ड केलेले मेसेज याही ग्रुपवर सुरू झाले. ग्रुप सुरू करण्याचा उद्देश बाजूला राहतोय की काय असे सर्वानाच वाटू लागले. त्यातूनच वाट काढीत कोणालाही न दुखवता येणारे मेसेज येऊ दिले. मात्र, या ग्रुपमधील दशरथ जाधव, राहूल शिंदे, प्रदीप नाळे अणि शिवाजी शिंदे यांनी ग्रुपसाठी एक कोअर कमिटी तयार केली.
कोअर कमिटी सुरू करण्याचा उद्देश एकदम सोपा आणि साधा होता. तो म्हणजे सामाजिक उपक्रम हाती घेऊन ज्या शाळेत आपण शिकलो. त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देणे. याबरोबरच आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला की, माळेवाडीतील ज्या व्यक्तींनी संघर्ष करून विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. अशा व्यक्तींना वाडीच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करणे, दोन्ही उपक्रम सुरू करण्यावर सन 2018 मध्येच शिक्कामोर्तब झाले. मात्र, पुरस्काराला नाव काय द्यायचे हा प्रश्न थोडासा पुढे आला. मात्र, त्यालाही तत्काळ उत्तर मिळाले. व्हॉटस अप ग्रुपचे असलेले ‘माळेवाडी आयकॉन्स’ हेच नाव योग्य राहील असे ठरले. मातीतील माणसांनी मातीतून घेतलेली भरारी. त्याच मातीतील नावानेच पुरस्कार देणे केव्हाही चांगले आणि योग्य ठरले. असे सर्वांचेच एक मत आले. मग काय लागले सगळे तयारीला. पहिला पुरस्कार कोणला द्यायचे तेही अगदी पक्के झाले. ज्या माळेवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण (पहिली ते चौथी) घेऊन पुढे गेलो. ज्या शिक्षकांनी आपल्यावर संस्कार केले. त्या शिक्षकांचाच पुरस्कार देऊन सन्मान केला तर… कल्पना अगदी चांगली होती. केव्हा द्यायचे पुरस्कार याचीही चर्चा लागलीच झाली आणि 26 जानेवारी 2018 ही तारीख पक्की झाली. सर्व जण अतिशय उत्साहाने कामाला आपल्याच गुरूजनांचा पुरस्कार देऊन सन्मान करणे ही बाब अतिशय वेगळी होती.
आम्हांला त्या-त्या काळात शिक्षणाबरोबर जगात कसे वागायचे याचे संस्कार देणारे गायकवाड गुरूजी, सपाटे गुरूजी, येवले गुरूजी आणि शेख बाई यांना पहिल्यांदा ‘माळेवाडी आयकॉन्स’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. एकदम भरदार झाला कार्यक्रम, सन्मानपत्र आणि सन्माचिन्ह देऊन या सर्वांना सन्मानित केले. याबरोबरच शाळेसाठी वेगवेगळे आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले सर्व शिक्षणोपयोगी साहित्य ग्रुपने दिले. हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. काही वर्तमानपत्रात बातम्या देखील आल्या. मात्र, यावर न थांबता हा उपक्रम प्रत्येक वर्षी सुरू रहावा असा निश्चय सर्वांनीच केला.
दुसऱ्या वर्षी म्हणजे 26 जानेवारी 2019 मध्ये पुन्हा पुरस्कार देण्याची वेळ आली. हे पुरस्कार देण्यापूर्वी कोअर कमिटीमधील सदस्यांनी व्हॉटस अप ग्रुपमधील इतर सदस्यांना आवाहन करून त्यांनी नावे सुचवावीत असे ठरले. त्यानुसार डिसेंबर महिन्यात ग्रुपवर आवाहन करण्यात आले. त्यास सर्व सदस्यांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. अपेक्षेपेक्षा जास्त नावे आली. मात्र, कोणाची पुरस्कारासाठी निवड करावी यासाठी आमच्यापेक्षा वयाने मोठे असलेले गुरूजन यांचा सल्ला घेण्यात आला. त्यांच्या सल्ल्यानुसार भीमराव जाधव (सेवानिवृत्त अधिकारी वनविभाग), ठकसेन उर्फ बापू जाधव (सेवानिवृत्त अधिकारी एनडीए पुणे आणि संस्थापक सिक्युरिटी एजन्सी), सचिन गोपाळ शिंदे (इंटिजिलन्स विभाग), बाबासाहेब उर्फ संजय शिंदे (कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई), विजय गायकवाड (प्राध्यापक- रयत शिक्षण संस्था-दहिवडी कॉलेज) यांना माळेवाडी आयकॉन्स पुरस्कार देऊन यथोचित सन्मान केला.
काही तांत्रिक कारणामुळे 26 जानेवारी 2020 मध्ये पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला नाही. मात्र,15 ऑगस्ट 2020 मध्ये माळेवाडी आयकॉन्स पुरस्कार देण्याचे पुन्हा ठरले आणि काही दिवसातच पाच नावे पुढे आली. त्यात हनुमंत बाबासो शिंदे (सैनिक), प्रकाश गजानन होळकर (सैनिक), रतन तायप्पा साळुंखे (सेवानिवृत्त सैनिक), रामभाऊ दशरथ घोलप (सेवानिवृत्त पुरवठा निरिक्षक-महाराष्ट्र शासन), शरद सदाशिव जाधव (व्यावसायिक) आणि माळेवाडी शाळेतील शिक्षिका सीमा राहूल बनकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी सन्मानार्थीच्या घरी जावून पुरस्कार प्रदान केले.
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन होते. परिणामी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून हे पुरस्कार प्रदान केले. अतिशय छोटेखानी झालेल्या या कौतुक सोहळ्यासाठी सन्मानार्थीच्या घरातील महिला वर्गासह अगदी वयोववृध्द आणि मुले देखील उपस्थित होते. या घरगुती सन्मान सोहळ्याने सर्वांचेच भान हरपून गेले. अशाच प्रकारे पुढील काळातही मातीतील ‘माळेवाडी आयकॉन्स’ हा पुरस्कार मातीतून उत्तुंग भरारी घेणाऱ्यांना देण्यात येणार आहे. कामच असे करा की, प्रत्येकाच्या घरात हा पुरस्कार पोहचावा प्रत्येकाच्या कामास हा पुरस्कार मिळावा हा एकच उद्देश हा पुरस्कार प्रदान करण्यामागे आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘माळेवाडी आयकॉन्स’ या व्हॉटस अप ग्रुपच्या कामास आता ख-या अर्थाने मूर्तरूप येऊ लागले आहे. भविष्यात आणखी मोठी भरारी घेण्याच्या तयारीत हा ग्रुप आहे.