पुणे: पोषक वातावरणामुळे नैऋत्य मोसमी पावसाची (मान्सून) आगेकूच सुरूच आहे. अरबी समुद्र ते केरळ आणि लक्षव्दीप ते केरळची किनारपट्टी अशा दोन चक्रीय स्थिती हवेच्या वरच्या भागात तयार झाल्या आहेत. त्यामुळे मान्सून गतिमान झाला आहे. येत्या 24 तासात दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव, कोमोरीन आणि बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व आणि पश्चिम भागात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
चक्रीवादळानंतर पोषक स्थितीमुळे मान्सूनची आगेकूच जोरदार सुरू आहे. मान्सूनने बंगालच्या उपसागरातील काही भागासह अंदमान, निकोबार बेटांचा बहुतांश भाग काबीज केला आहे. सध्या मान्सूनची आगेकूच होण्यास अतिशय अनुकूल स्थिती तयार झाली आहे. त्यामध्ये अरबी समुद्रापासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. याबरोबरच पुढील 48 तासात अरबी समुद्राच्या दक्षिण पश्चिम आणि मध्यपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. या पट्ट्यामुळे मान्सून आणखी गतिमान होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.