पुणे: पोषक स्थितीमुळे मान्सूनची दोन दिवसांपासून आगेकूच सुरू राहिल्यामुळे अगदी वेळेतच कोकण, मध्यमहाराष्ट्र मराठवाड्यापर्यंत गुरूवारी मान्सूनने मजल मारली. दरम्यान, येत्या चोवीस तासात मान्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापणार आहे, परिणामी पुढील दोन ते तीन दिवस राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस बरसेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
कोल्हापूर, सातारा, पुण्यासह मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या भागात अलर्ट जारी केला असून, सोसाट्याच्या वा-यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही हवामान विभागाने जाहीर केले आहे.
निसर्ग वादळाने हवेतील आर्द्रता खेचून घेतली. त्यामुळे तमिळनाडू, कर्नाटक आणि कारवारपर्यंत आलेला मान्सून रखडला होता. वादळ पूर्ण क्षमल्यानंतर मात्र, पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झाले. त्यामुळे मान्सूनने आगेकूच करण्यास प्रारंभ केला. बंगालच्या उपसागरातील पश्चिम मध्य भागात असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तर पूर्व भाग, उत्तर आंध्रप्रदेशाची किनारपट्टी, दक्षिण ओडिशाची किनारपट्टीकडे सरकला आहे. त्यामुळे मान्सूनची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण तयार झाले. परिणामी गुरूवारी मान्सून गोवा, कोकण (तळकोकण) मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यापर्यंत दाखल झाला. याबरोबरच मान्सूनने कर्नाटकाचा काही भाग, रॉयलसीमाचा सर्व भाग, आंध्रप्रदेशाची किनारपट्टी, तेलंगण, छत्तीसगड, दक्षिण ओडिशा, बंगालच्या उपसागरातील पश्चिम मध्य भाग, ईशान्य भारतातील नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या राज्यापर्यंत पोहचला आहे.
पुढील 48 तासांत मान्सून महाराष्ट्रातील उर्वरित भाग व्यापणार आहेच. याशिवाय तेलंगण, पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालचा उपसागर, अरूणाचल प्रदेश, आसाम मेघालय, सिक्कीम (पूर्ण भाग), ओडिशाचा काही भागापर्यंत मजल मारणार आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.