पुणे: नैऋत्य मोसमी पावसाची (मान्सून) अनुकूल स्थितीमुळे आगेकूच सुरू असून रविवार, 14 जून रोजी मुंबईत दाखल होणार आहे. तसेच मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अतिवृष्टी तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामानशास्त्र विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
अनुकूल स्थितीमुळे महाराष्ट्रात मान्सूनची वेगाने वाटचाल सुरू आहे. मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भाग शनिवारी मान्सूनने व्यापला आहे, तर मुंबईत रविवारी मान्सून दाखल होणार आहे. राज्यात मान्सून दाखल होताच काही भागात जोरदार पाऊस बरसण्यास सुरूवात झाली आहे. यंदा प्रथमच मान्सून कोकणातून थेट मराठवाड्यात पोहचला आणि जालना, परभणी, नांदेड, हिंगोली तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव भागात पाऊस चांगलाच बरसत आहे. मध्यमहाराष्ट्र आणि मुंबईत मात्र तो यंदा उशिरा आला.
दरवर्षी कोकणमार्गे मान्सून मुंबईत दाखल होत असतो. मात्र, निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सूनने दिशा बदलली आणि ज्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्याच मार्गाने यंदा मान्सून गेला असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले. मान्सून रविवारी मुंबईत दाखल होणार आहे. दाखल होताच पाऊस चांगलीच हजेरी लावणार आहे. दरम्यान, पुढील चोवीस तासात मान्सून मध्य अरबी समुद्र, उत्तर अरबी समुद्र, छत्तीसगड, झारखंड, बिहार, दक्षिण गुजरात, दक्षिण मध्यप्रदेश या भागात पोहचणार आहे.