पुणे: मान्सूनसाठी 12 जूनपासून पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे मान्सून कोकणात बुधवार, 10 जूनपर्यंत आला तरी उर्वरित महाराष्ट्रात पोहचण्यास 12 ते 14 जून असा कालावधी लागणार आहे. यावेळी तो राज्यात एकसारखा बरसेल अशी स्थिती आहे. ही माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिली.
पोषक वातावरणामुळे मान्सूनची आगेकूच जोरदार सुरू असून, येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी वर्तविला आहे.
दरम्यान, 13 जूनपर्यंत राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे (घाटमाथा), सांगली, सोलापूर, अहमनदनगर या भागात जोरदार पाऊस बरसणार आहे. तसेच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. परिणामी विजांचा कडकडाट, मेघगर्जना होणार आहे. याशिवाय राज्यातील रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, पालघर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर या भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे तमिळनाडू, कर्नाटकाची किनारपट्टी या भागात थबकलेल्या मान्सूनने आगेकूच करण्यास सुरूवात केली आहे. कर्नाटकची किनारपट्टी पार करून मान्सून सोमवारी कारवारपर्यंत आला होता. पोषक वातावरणामुळे मान्सूनची आगेकूच सुरू असून येत्या 48 तासात गोवा, कोकणची किनारपट्टी (तळकोकण) यासह महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती आहे. महाराष्ट्राबरोबरच मध्य अरबी समुद्र, कर्नाटकाचा काही भाग, रॉयलसीमा, तमिळनाडूचा काही भाग, तेलंगणाचा काही भाग, आंध्रप्रदेशचा काही भाग, बंगालच्या उपसागरातील मध्य भागासह ईशान्य भारतातील ओडिशा, सिक्कीम या राज्यापर्यंत मान्सून धडक मारणार आहे.
दरम्यान, अद्यापही बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला नाही. मात्र, येत्या 48 तासात बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती तयार होणार आहे, तर मध्य गुजरातवर तयार झालेली चक्रीय स्थिती मंगळवारी दक्षिण गुजरातकडे सरकली असून ती आता अरबी समुद्रापर्यंत आहे. याबरोबर दक्षिणपूर्व अरबी समुद्रापासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे . या सर्व स्थिती मान्सून पुढे नेण्यासाठी पोषक आहेत. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मान्सूनची आगेकूच होण्यास पोषक वातावरण: बंगालचा उपसागर, दक्षिण गुजरात ते अरबी समुद्र आणि अरबी समुद्र आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रापासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती आहे. या स्थितीमुळे मान्सूनची आगेकूच होण्यास पोषक स्थिती असल्याची माहिती पुणे येथील वेधशाळेचे हवामान विभाग प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली.