पुणे: पोषक वातावरणामुळे नैऋत्य मोसमी पावसाची (मान्सून) वाटचाल अधिक गतिमान झाली असून, एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाआहे.
अमफन चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर पुढील 48 तासात बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटांवर थांबलेला मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती तयार झाली आहे. त्यानंतर मान्सूनने पुढील प्रवासास सुरूवात केली. दरम्यान, सध्या बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागासह अंदमान, निकोबार बेटांपासून मान्सूनची प्रगती होण्यास सुरूवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात ढग जमा झाले आहेत. त्याचबरोबर येत्या 48 तासात अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागावर कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. हा पट्टा पुढील तीन दिवसात दक्षिण ओमन आणि पूर्व येमेनच्या किनारपट्टीकडे झुकणार आहे. त्यानंतर पुन्हा बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व आणि अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भागावर 31 मे ते 4 जून दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या स्थितीमुळे वा-याचा प्रचंड वेग आणि मुसळधार पाऊस अंदमान, निकोबार बेटांसह आसपासपाच्या भागात पडण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळेच मान्सून एक जूनला केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे.