संग्रहित छायाचित्र
पुणे: बंगालच्या उपसागरासह अंदमान निकोबार बेटांवर येत्या 24 तासात नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) दाखल होणार आहे. मात्र, पश्चिम बंगाल, बांग्लादेश ते अगदी ओडिशाच्या किनारपट्टीपर्यंत 18 ते 21 मे दरम्यान अतितीव्र चक्रीवादळ येणार आहे. त्यामुळे केरळसह कर्नाटक ते कोकण आणि आसपासच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस बरसणार आहे. दरम्यान, या अतितीव्र चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावला असून केरळपर्यंत पोहचण्यास 5 जून उजाडणार आहे.
बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर अतिखोल कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. पुढील 24 तासात या अतिखोल कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये त्यानंतर 18 ते 21 मे दरम्यान हे चक्रीवादळ अतितीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतरीत होणार आहे.
ओडिशाच्या दक्षिण भागातील पारादिप किनारपट्टीपासून ते पश्चिम बंगालच्या खेपपुपारा तसेच बांग्लादेशपर्यंत पोहचणार आहे. या अतितीव्र चक्रीवादळामुळे किनारपट्टीसह समुद्रात ताशी 55 ते 65 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. यामुळे केरळ, कर्नाटक तसेच कोकण व आसपासच्या भागात मुसळधार पाऊस बरसणार आहे. दरम्यान, या स्थितीमुळे मान्सून बंगालच्या उपसगारासह अंदमान निकोबार बेटांवर येत्या 24 तासात दाखल होणार असला तरी चक्रीवादळामुळे वातावरणातील बाष्प खेचून घेणार असल्याने केरळकडे मान्सूनचा प्रवास धिम्या गतीने होणार आहे.