पुणे: बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागावर चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) पुढे सरकण्यास पोषक असल्यामुळे येत्या चोवीस तासात मान्सून बंगालच्या उपसागरातील मध्य आणि दक्षिण भागासह अंदमान समुद्रात दाखल होणार आहे.
अमफन चक्रीवादळामुळे मान्सून प्रवास अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या काही भागापर्यंतच थांबला होता. 25 मे पासून हा प्रवास गतिमान होण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले. मंगळवारी (दि.26) या पोषक वातावरणास गतिमान करण्यासाठी बंगालच्या उपसागरातील दक्षिण पूर्व भागात चक्रीय स्थिती तयार झाली आहे. या स्थितीमुळेच मंदावलेला मान्सूनचा पुढील प्रवास सुरू होणार आहे. येत्या चोवीस तासात मान्सून अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागरातील मध्य आणि दक्षिणपूर्व भागात दाखल होणार आहे.