# शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते डाॅ.मानवेंद्र काचोळे यांचे निधन.

औरंगाबाद: शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव, शास्त्रज्ञ डॉ.मानवेंद्र सखाराम काचोळे यांचे बुधवार, २७ जानेवारी रोजी सायंकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला, यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मे २०१४ मध्ये ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जिवरसायनशास्त्र विभागप्रमुख, प्राध्यापक यापदावरून सेवानिवृत्त झाले.  २००९-१० या काळात ते कुलसचिव तसेच २००६ ते २०१० काळात ते विभागप्रमुख व्यवस्थापन परिषद सदस्य होते. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यासोबत त्यांनी अखेरपर्यंत काम केले. सध्या ते शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीवर कार्यरत होते. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. याच पक्षाच्या वतीने २००४ मध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सध्या एमजीएम विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजीचे ते संशोधक संचालक म्हणून कार्यरत होते. जवखेडा तालुका कन्नड येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. काचोळे हे सध्या खोकडपुरा येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंगलताई, दोन मुली, जावई व मोठा मित्र परिवार आहे.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया:

विभागाला उंचीवर नेण्यात मोठे योगदान: 

डॉ मानवेंद्र काचोळे यांच्या निधनाने वृत्त ऐकून धक्काच बसला.माझ्या कुलगुरू पदाच्या पहिल्या काळात त्यांचे कुलसचिव या नात्याने प्रशासनात छान सहकार्य लाभले।त्यांचे शेती चळवळी तील कार्य नोंद घेण्या योग्य महत्वपूर्ण होते।जीव रसायनशास्त्र विभागाला वेगळी उंची प्रदान करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान होते.आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो ही प्रार्थना. -डॉ.विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू

बिल्लाधारी प्राध्यापक हरपला:

डॉ. मानवेंद्र काचोळे यांना मी विद्यार्थी होते तेव्हापासून ओळखत होतो. अत्यंत अभ्यासू असलेला हा संशोधक वृत्तीचा प्राध्यापक तितकाच तळमळीने शेतकरी कष्टकऱ्यांसाठी विचार देखील करत होता. शेतकरी संघटनेचा बिल्ला लावलेला प्राध्यापक ही ओळख त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जतन केली. त्यांच्या जाण्याने विद्यापीठाचे, शेतकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. -डॉ.नागनाथ कोतापल्ले, माजी कुलगुरू

सामाजिक प्रयोगशाळेतील संशोधक हरपला:

डॉ.काचोळे यांच्या निधनाची बातमी ऐकुन दुःख वाटले. औरंगाबादेत आल्यानंतर काचोळे सरांच्या कार्याबद्दलची माहिती त्यांचे संशोधक विद्यार्थी, सहकारी यांच्याकडून समजली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र विभागाला नावलौकिक मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. विभागातील संशोधनासोबतच चार भिंतीच्या बाहेरील सामाजिक प्रयोगशाळेत कार्य करणारा शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता हरपला आहे. डॉ. मानवेंद्र काचोळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. -डॉ.प्रमोद येवले, कुलगुरू डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *