# मराठा आरक्षणाबाबत खा. चिखलीकरांनी खुल्या चर्चेला यावे -माजी मंत्री डी.पी. सावंत यांचे आव्हान.

नांदेड: मराठा आरक्षणासंदर्भात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर धादांत खोटे आरोप आणि समाजाची दिशाभूल करणारे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी या विषयावर खुल्या चर्चेला यावे, असे आव्हान माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी दिले आहे.

नांदेडच्या खासदारांना व्यक्तीद्वेषाने पछाडले आहे. त्यामुळेच ते सतत पालकमंत्र्यांवर निराधार व असत्य आरोप करीत असतात. परंतु, मराठा आरक्षणासारख्या कोणत्याही सामाजिक मुद्याचा राजकारणासाठी वापर करणे अतिशय चुकीचे आहे, असे स्पष्ट करत खा. चिखलीकर यांच्या आरोपांना माजी पालकमंत्री डी.पी. सावंत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अशोकराव चव्हाण यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. त्या माध्यमातून त्यांनी एक समन्वयाचे वातावरण निर्माण केले. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करताना दिलेला अंतरिम आदेश न्यायसंगत नाही, असे मत अनेक विधीज्ञांनी जाहीरपणे मांडले आहे. मात्र, सत्ता गमावल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या सत्तातूर नेत्यांनी बिनबुडाचे आरोप करण्याचे सत्र सुरू केले आहे. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर पुरेसा अभ्यास असेल तर त्यांनी केवळ प्रसिद्धी पत्रक काढून थांबू नये. तर या विषयावर त्यांनी खुल्या चर्चेला यावे, असे आव्हान आम्ही देत आहोत. हिंमत असेल तर खासदारांनी हे आव्हान स्वीकारावे; अन्यथा त्यांचे आरोप केवळ राजकीय आहेत हे स्पष्ट होईल, असे डी.पी. सावंत यांनी म्हटले आहे.
या मतास आ.माधवराव जवळगावकर, आ.मोहनराव हंबर्डे, माजी आ.वसंतराव चव्हाण, माजी आ.हनमंतराव बेटमोगरेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे यांनीही सहमती दर्शवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *