# पुणे जिल्ह्यात प्रवेश करणारांची वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य.

 

पुणे: सद्यस्थितीत लॉकडाऊनमुळे परराज्यात व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित मजूर व इतर नागरिक बस, रेल्वे तसेच खाजगी वाहनाने प्रवास करुन पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण प्रवास करुन आलेल्या प्रवाशांमधून आढळण्याची शक्यता आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होवू न देता तत्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. तरी प्रवास करुन आलेल्या सर्व प्रवाशांची तालुक्यांच्या / गावांच्या सीमेवर वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये सर्व उपविभागीय अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांना पुणे जिल्ह्यात परराज्यातून व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांची तालुक्याच्या / गावाच्या सीमेवर चेकपोस्ट तयार करुन त्या ठिकाणी सर्व विभागांच्या संयुक्त पथकामार्फत तपासणी करण्यात यावी. तपासणी दरम्यान कोणतीही कोरोना विषाणूची लक्षणे नसल्यास संबंधितांच्या हातावर होम क्वारंटाईन असा शिक्का मारुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात यावे.

ज्या ठिकाणी प्रवास करुन आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करणे कौटुंबिक कारणाने शक्य नसल्यास अशा प्रवासी नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात यावे. वैद्यकीय तपासणी दरम्यान कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्यास संबंधित प्रवासी नागरिकांना कोरोना तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात यावे. होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या प्रवासी नागरिकांना घरगुती विलगीकरणादरम्यान कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्यास त्यांना तत्काळ कोरोना तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात यावे. प्रवास करुन आलेल्या सर्व नागरिकांना विलगीकरणादरम्यान आरोग्यविषयक सर्व काळजी घेण्याबाबतच्या सूचना देण्यात याव्यात, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

आदेश व परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रवास करुन आलेल्या नागरिकांची स्वतंत्ररित्या नोंद ठेवण्यात यावी. तालुक्यात आलेल्या नागरिकांची माहिती दररोज तालुक्यातील आरोग्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. सर्व माहिती नियंत्रण कक्षाला कळविणेत यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांनी विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने सर्वसाधारणपणे जबाबदारी देण्यात आलेली आहे. तरी आदेशाची सर्व विभागांच्या संयुक्त पथकामार्फत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. परराज्यातून व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून प्रवास करुन आलेला कोणताही प्रवासी चेक पोस्टवर नोंदणीशिवाय प्रवेश करणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व संबंधित यंत्रणा अधिकारी यांनी देण्यात आलेल्या जबाबदारीनुसार कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *