पद्मभूषण पं.जसराज यांच्या अनेक मैफिली पुणे, मुंबई व गोव्यात मी ऐकल्या आहेत. सवाई गंधर्व पुण्यात तर दरवर्षी त्यांचे गाणे हमखास असायचेच. रात्रभर मैफल असे आणि मध्यरात्री त्यांचे गायन होत असे. पं. भीमसेन जोशी ऐकायला स्टेजच्या बाजूला बसत. पहाडी स्वर व ईश्वराची प्रार्थना त्यांचे स्वर करीत आहेत असा माहोल ते त्यांच्या गायनातून करत व रसिकही हरखून जात असत. त्यांची सुमधुर वाणी आणि स्टेजवर येण्याची पद्धती उत्सुकता वाढवणारी असायची. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि जसराजजी जय हो जय हो करत दोन्ही हात रसिकांना उंचावून अभिवादन करत यायचे.
स्टेजवर त्यांचा ताफा म्हणजे काय धमालच असे. तानपुरे, तबलजी, मृदंगाचार्य, सहगायक, शिष्यवर्ग, टाळकरी असा तो लवाजमा. आणि पंडितजी गायला सुरुवात करत ते त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने धीरगंभीर स्वरात इश स्तवनाने. मग निवडलेला राग गायचे. उत्तुंग संगीत सेवक. जागतिक पातळीवरचे महान शास्त्रीय गायक म्हणून त्यांची जगभर ख्याती होती. दुर्गा जसराज ह्या त्यांच्या कन्या. त्यांनी दूरदर्शनवर आयडिया जलसा व आता लाॅकडाऊन काळात फेसबुकला उत्सव हे सदर खूप गाजवले. त्यांच्या अंबाजोगाईला 1980 च्या दशकात मराठवाडा संगीत संमेलनात गायन झाल्याचे नक्की आठवते.
तरंगिनी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सव, गोवा कला अकादमी पणजीत भरवला जातो. त्यातील मी ऐकलेली त्यांची शेवटची मैफिल असावी. तबल्यावर पं. कालिनीनाथ मिश्र होते. सहगायनाला नांदेडची आवडती शिष्या अंकिता जोशी होती. कायम लक्षात राहील अशी ती मैफिल होती. मी अगदी समोर बसून ही मैफल ऐकली आहे. या मैफलिचे फोटो ही मी काढले आहेत. त्यांना ते खूप आवडले व फेसबुक इनबॉक्समध्ये मला त्यांनी धन्यवाद ही दिले होते. अशा या मेवाती घराण्याच्या गायकास व भारतमातेच्या सुपूत्रास भावपूर्ण श्रद्धांजली!
-दगडू लोमटे, अंबाजोगाई
मोबाईल: 9823009512