# सुशांतला पडली होती औरंगाबादची भूरळ; एम. एस. धोनी.. चित्रीकरणासाठी होता तीन दिवस.   

 

औरंगाबाद:   प्रतिथयश अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (दि.१४ जून) मुंबईतील वांद्रे येथील आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने औरंगाबादेत चित्रीकरण झालेल्या “एम. एस. धोनी अन्टोल्ड स्टोरी ” या चित्रपटाच्या काही आठवणी जागवल्या आहेत.  औरंगाबादेत सलग तीन दिवस विविध ठिकाणी सुशांत सिंह राजपूत याच्यावर विविध प्रसंग चित्रीत करण्यात आले होते. औरंगाबाद शहराने आपणास भूरळ घातल्याची प्रतिक्रिया त्याने त्यावेळी व्यक्त केली होती.

केवळ ३४ वर्षीय अभिनेत्याच्या आत्महत्येच्या घटनेने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असून, औरंगाबादेतील त्याच्या चाहत्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियांतून अभिनेता सुशांत सिंह राजपूत यास व्यथीत अंत:करणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सन २०१५ मध्ये शूटिंग:  अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री कियारा अडवाणी २०१५ मध्ये आपल्या टीमसोबत “एम. एस. धोनी अन्टोल्ड स्टोरी” या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या निमित्ताने तब्बल तीन दिवस औरंगाबादेत तळ ठोकून होते. जालना रोडवरील हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये ते थांबले होते. या काळात सलग तीन दिवस “एम. एस. धोनी अन्टोल्ड स्टोरी” या चित्रपटाचे चित्रीकरण पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात झाले होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पायथ्याशी असलेली औरंगाबाद लेणी, बेगमपुर्यातील बीबी का मकबरा, मौलाना आझाद कॉलेज परिसर, हॉटेल ताज रेसिडेन्सी आदी ठिकाणी “धोनी”  चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण झालेले आहे. यावेळी अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. चित्रीकरण पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. यात तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय होती. अभिनेता सुशांतला प्रत्यक्ष पाहण्यासाठी मराठवाड्यातून तरुण आले होते. सुशांत सिंह राजपूत याच्या राजबिंड्या व्यक्तिमत्त्वामुळे त्याने तरुणाईला भूरळ घातली होती. त्यामुळे त्यास पाहण्यासाठी मौलाना आझाद काॅलेज परिसरातील हाॅटेल मॅनेजमेंट परिसरात तरुणाईची तोबा गर्दी उसळली होती. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेकांची इच्छा असूनही आवडता अभिनेता सुशांतला कोणालाही भेटता न आल्याने सगळ्यांचा हिरमोड झाला होता, असे प्रा. डाॅ. शाहेद शेख यांनी सांगितले.

सुशांत याला औरंगाबाद शहरात पत्रकार परिषद देखील घ्यावयाची होती. मात्र, प्रचंड गर्दीमुळे घेता आली नाही.  २०१३ मध्ये सुशांत सिंह राजपूत याने ” काई पो चे” सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंतर “शुद्ध देसी रोमान्स” या सिनेमातही तो झळकला. पण, बॉलिवूडमध्ये त्याला खरी ओळख दिली ती “एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी” या सिनेमाने. या सिनेमात त्याने भारताचा माजी कर्णधार एस. एम. धोनी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर सुशांत “केदारनाथ” या सिनेमातही सारा अली खानसोबत दिसला होता. “सोन चिडिया”, “डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी”, “छिछोरे” यासारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. सुशांतच्या एक्स मॅनेजर दिशा सेलीना हिने ९ जून रोजी मालाडमध्ये चौदाव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती.

सुशांत सिंह राजपूत मूळचा बिहारमधील पाटणा येथील रहिवासी होता. २१ जानेवारी १९८६ मध्ये त्याचा जन्म झाला होता. वडील शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्याचे कुटुंब २००० मध्ये दिल्लीत स्थायिक झाले. प्राथमिक शिक्षण पाटणामध्ये सेंट करेंस हायस्कूलमध्ये आणि पुढील शिक्षण दिल्लीच्या कुलाची हंसराज माॅडेल स्कूलमध्ये पूर्ण केले. दिल्लीमधील कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून त्याने मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *