अनेक कारणांनी अनिल बाबांचे नाव ऐकलेले. अनेक पुस्तके, विविध कार्यक्रमातून, वृत्तपत्रातील लेख, बातम्या, ओरिगामी बाबत, त्यांच्याशी संपर्क झालेले मित्र त्यांचा स्वभाव, वर्तन व कोणीही भेटला तरी त्याच्याशी आपुलकीतून झालेला संवाद याबाबत त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आदर निर्माण होत असे. वैद्यकीय शिक्षण झाले तरी त्यांचे जे नाते समाजात निर्माण केले ते अद्भुत म्हणावे लागेल. मुक्तांगण बाबत मी इतकं ऐकलं होतं. अनेकांचे अनुभव त्यातून त्या व्यक्तीची व्यसनातून झालेली सुटका व त्यांनी आपले जीवन बदलून टाकले असे किस्से कानावर पडत असत.
आपण त्यांना कधी भेटावे? असा प्रश्न मला कधी पडला नाही. पण तसे भेटीचे योग जीवनात येतील याची साधी कल्पना मी केली नव्हती. यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचा साधा स्वयंसेवक म्हणून मी लुडबुड करू लागलो. कै. अरुण नायगावकर व कै. प्रा. जी. एम. रेडडी यांच्या प्रेरणेने मी समारोहाच्या कार्यात कै. भगवानराव लोमटे बापू यांच्या संमतीने मी चंचू प्रवेश केला आणि समारोहाचे पाहुणे निमंत्रित करताना प्रवास सुरु झाला. २३ वर्षापूर्वी कै. प्रा. अरुण नायगावकर, प्रा. सुधीर वैद्य, प्राचार्य प्रकाश प्रयाग यांच्या सोबत मी पुण्याला यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे पाहुणे निमंत्रित करताना यशवंतराव चव्हाण यांचे जवळचे मित्र व ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांना भेटण्यास गेलो. सेनापती बापट रोडवरील पत्रकार नगर येथे ते राहत होते. (पूर्वी कधी तरी या नगरात यदुनाथ थत्ते यांना पण भेटून गेलो हे तिथे गेल्यावर आठवले.)
रामभाऊ जोशी यांना भेटण्यास ‘कृष्णा’ या इमारातीत गेलो. दुसऱ्या मजल्यावर ते राहत होते. पहिल्या मजल्यावर जाताना दोन घरे होती. त्यात डावीकडे एक पाटी होती डॉ. अनिल अवचट व उजव्या बाजूला डॉ. सतीश आळेकर. दोन्ही नावे मला परिचित होती. अनिल अवचट यांचे लेखन, पुस्तके व इतर कार्य. सतीश आळेकर यांचे नाव ‘घाशीराम कोतवाल’ या नाटका मूळे माहीत होते. कारण १९८३ साली अ. भा. मराठी साहित्य संमेलन अंबाजोगाईला झाले. त्यात हे नाटक झालं होतं. मला ती घरे बघून खूप आनंद वाटला. दुसऱ्या मजल्यावर रामभाऊ जोशी यांना भेटलो. त्यांनाही सवाई गंधर्व संगीत समारोहात वावरताना पाहिले होते. त्यामुळे त्यांची तशी ओळख मला आली. पण ते पत्रकार होते व यशवंतराव चव्हाण यांच्या जवळ सावली सारखे होते हे तिथे गेल्यावरच बोलण्यातून कळले. त्यांना निमंत्रण दिले त्यांनी यायचे कबुल केले. व ते या कार्यक्रमास आले.
परत आल्यावर माझ्या नजरेतून अनिल अवचट यांचे नाव, घराची पाटी जाईना. त्यांच्या बद्दल कुतूहल त्यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली. कधीतरी त्यांना आपण या कार्यक्रमास बोलवावे ही खूणगाठ मनात रुजून गेली. पण तो योग कधी येईल? हे मला तेंव्हा सांगता येत नव्हते. कारण सर्व सिनियर मंडळी ते काम पाहत होते आणि बापूंच्या पुढे मी फार बोलत नसे. त्यांचा एक नैतिक दरारा माझ्या मनात कायम होता. माझी समारोहाचा आखणीत हळू हळू गती येत होती. साहित्य, संगीताची आवड. सामाजिक कामात मला अधिक रस होता. दरवर्षी माझ्यावर एक एक नवी जबाबदारी येऊ लागली. मी कवी व संगीत गायक कोण असावेत इथपर्यंत माझ्या मताला मान्यता होती. पुढे उद्घाटन व समारोपाचा पाहुणा कोण असावा? यात मी जाणकार व मातब्बर पाहुण्यांची नावे सुचवू लागलो आणि हळू हळू माझ्या सूचनेला मान्यता देऊन मलाच त्या पाहुण्यांशी संपर्क करण्याची संधी मिळू लागली आणि त्यात मी यशस्वी होऊ लागलो. य. दि. फडके यांच्या पासून ते अनेक मान्यवर माझ्या विनंती वरून या समारोहात आले. ती यादी आता खूप मोठी आहे. पाहुण्यांशी कसं बोलाव? त्यांच्या प्रवासाची खबरदारी कशी घ्यावी? त्यांना बोलताना आपण त्यांचे काय वाचले वा ऐकले आहे? हे माहीत असले पाहिजे. त्याचा अभ्यास करूनच मी पाहुण्यांशी संपर्क करीत असे.
२०११ साली २७ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या कार्यक्रमात अनिल अवचट यांना बोलवावे असे पक्के झाले. त्यापूर्वी कांही वर्ष त्यांना निमंत्रण देत होतो. कांही तरी अडचणी व कारणांनी ते जमत नव्हते. नुकताच फेसबुकला बहर आला होता. त्याची चर्चा होत होती. मी ही नुकताच फेसबुकवर आलो होतो. अनिल अवचट हेही फेसबुकवर आले होते. मी त्यांना मित्र होण्याची विनंती केली त्यांनी ती स्वीकारली. कोणे एकेकाळी त्यांच्याशी बोलता येईल का? भेटता येईल? अशी शंकाच होती. पण आता आम्ही मित्र झालो होतो. त्यांच्या पोष्ट वाचत होतो. कॉमेंट, लाईक, मते मांडत होतो. माझे मित्र, कौटुंबिक स्नेह असलेले व अत्यंत संवेदनाशील कवी, लेखक बालाजी सुतार यांचे व बाबांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत हे मला फेसबुकच्या माध्यमातून कळले. बालाजी विषयी बाबांच्या मनात काय किंमत आहे हे मला उमजले होते. त्यांच्या मध्यस्थीने मी बाबांना यशवंत समारोहात निमंत्रण देण्याचे ठरवले. कारण बाबांचे लेखन, व्यसनमुक्तीसाठी त्यांनी केलेला ‘मुक्तांगण’ हा सामाजिक प्रकल्पाची उभारणी. त्यातून हजारो लोक व्यसन मुक्त होऊन आपली जीवनशैली बदलत होते. कुटुंबही तणावातून, चिंतेतूनही मुक्त होत होते. बाबांची वैचारिक बैठक, त्यांचे पर्यावरणाबाबत कार्य, चित्रकार, पत्रकार, ओरिगामी कला, संगीतात असलेला रस, बासरी वादन, ‘साधना’ व ‘पुरोगामी सत्यशोधक’ याचे संपादक म्हणून केलेले काम. समाजकार्याकडे कल असल्याने वैद्यकीय व्यवसाय न करता त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये घेतलेला सहभाग. सामाजिक क्षेत्रातील अनुभवाशी निगडीत लेखन. भ्रमंती व त्यातून लिखत केलेले समाजदर्शन. अशा भ्रमंतीतून लिहिलेले ‘पूर्णिया’ हे पहिले पुस्तक. त्यानंतर छंदाविषयी, आप्त, माणसं, गर्द, स्वतःविषयी, अमेरिका, कोंडमारा ही कांही पुस्तके मी वाचलेली. इतर अनेक पुस्तके त्यांची आहेत. आणखी एक खास आकर्षण त्यांच्याबाबत होते ते म्हणजे ‘आनंदवन’शी असलेले त्यांचे नाते. कारण बाबा आमटे यांच्या सोबत १९८५-८६ साली मी भारत जोडो अभियानात होतो. तिथे त्यांचे नाव सतत समोर येत असे. सोमनाथ श्रमसंस्कार शिबिरात, डॉ.अनिल अवचट, डॉ. कुमार सप्तर्षी, कुमार शिराळकर, स्मिता पाटील हे शिबिरार्थी होते हे आवर्जून कानावर पडत असे. नंतरच्या कालखंडात डॉ. विकास आमटे हे अनिल अवचट यांच्या पुस्तक सहकार्यातून त्यांनी व डॉ. प्रकाश यांनी अभ्यास केला व वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असे वारंवार आम्हाला सांगत आले. हेही मला अवचट यांना बोलावण्याचा मागचा हेतू व प्रेरणा होती.
समाजातील दुबळ्या, उपेक्षित, गरीबीत, रितिरिवाजांच्या पारंपरिक विळख्यात अडकलेल्या सामान्य माणसाच्या, वाईट परस्तिथीत व्याकुळ आयुष्याची ओळख करून देणारे, वेगळ्या विषयांना हात घालणारे लेखन बाबांनी केले. दुष्काळग्रस्त, दारिद्र्यातील, भटक्या जमातीची, कामगारांचे अंधकारमय शोषित जीवन या साऱ्यांचं विलक्षण दाहक दर्शन त्यांनी ‘माणसं’ मधून घडविले आहे. भोवतालच्या घटनांकडे, वृत्तीप्रवृत्तीकडे बघण्याची चौकस, शोधक नजर, उत्कट सामाजिक जाणीव, उच्च विद्याधारक, बुद्धीजीवी वर्गाच्या दांभिकपणाविषयीची चीड, त्यांच्या लेखनातून वेळोवेळी नेमकेपणाने व्यक्त झालेली दिसते. या सर्वांमागे समाजपरिवर्तनाची आस जाणवते. अनिल अवचटांचा जीवनविषयक दृष्टिकोन गंभीर, बांधिलकी हे मूल्य मानणारा आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनातून एक सखोल, संवेदनशील दृष्टिकोन व्यक्त होतो. विषय गंभीर असले तरी लालित्यपूर्ण मांडणीमुळे ते वाचकप्रिय, लोकप्रिय झाले आहे. हे इथे अधोरेखित करावे वाटते. म्हणूनही त्यांना अंबाजोगाईला बोलवावे हे मनात ठासून भरलेले होतेच.
२०११ साली मी बालाजी सुतार यांच्या मार्फत बाबांशी संपर्क केला. फोनवर बोलणे झाले. त्यांनी बाबांना यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या आयोजनाची कल्पना, स्वरूप, व आयोजक यांची भूमिका सांगितली. साहित्य, शास्त्रीय संगीत, शेती, युवक व महिलांसाठी प्रबोधन, लहान विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व बालआनंद मेळावा, ललित कला यांना प्राधान्य, यशवंत पुरस्कार असे आयोजन असते. हे सांगितल्यावर त्यांनी भेटीची तारीख व वेळ दिली. त्यादिवशी मी बालाजीसह भेटीला गेलो. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. पत्र दिले. त्यांनी ते नजर टाकून बाजूला ठेवले. बालाजी सोबत त्यांनी गप्पा सुरु केल्या. नानाविध प्रश्न. लेखन, कविता, व्यवसाय, कौटुंबिक माहिती, अर्थार्जन आणि मग एकमेकांच्या लेखनातील विषय, गप्पा. कितीतरी वर्षांपासून ते मित्र आहेत इतक्या सहज होत्या त्या गप्पा होत्या. मग मला प्रश्न केला. मी माझा परिचय सांगितला. बाबा आमटे यांच्या भरात जोडो सायकल अभियानात होतो हे सांगीतल्यावर त्यांना समाधान वाटले असा भाव मी त्यांच्या चेहऱ्यावर पहिला. मला हायसे वाटले. पत्रात तारखा दोन दिल्या होत्या. एक २५ व दुसरी २७ नोव्हेंबर. यापैकी एक तारीख हवी होती. मी त्यांना २७ तारखेचा आग्रह केला. तुमच्या हस्ते पुरस्कार द्यायचे आहेत. तेंव्हा तीच तारीख घेतली तर बरे होईल. त्यांनी जवळची छोटी दिनदर्शिका काढली. त्यात त्या तारखांना किंवा जोडून कांही कार्यक्रम आहेत का? हे पहिले आणि २७ नोव्हेंबर २०११ ही तारीख अंतिम केली. निघतांना एक विंनती केली. मला लॉजवर उतरविण्या ऐवजी कमोड असलेल्या घरी ठेव. जिथे उतरेल तिथेच जेवण करेन. ते मान्य करून आम्ही निघालो. मग माझा व त्यांचा फोनाफोनी संपर्क सुरू झाला. अंबाजोगाईला आल्यावर मी प्रा. अभिजित व डॉ. शुभदा लोहिया यांच्याकडे थांबता येईल हे ही ठरले. ट्रेनने येईल. दुसऱ्या दिवशी परत निघेल. हे ठरले. बालाजीकडे त्यांच्या येण्याजाण्याची व सोबत राहण्याची व्यवस्था दिली. प्रा. अभिजीत व डॉ. शुभदा लोहिया यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था आनंदाने घेतली.
उद्घाटन सत्रात पत्रकार, विचारवंत कुमार केतकर व नाट्य क्षेत्रातील राज काझी हे पाहूणे ठरले होते तर समारोपाला डॉ. अनिल अवचट व प्रा. अजित दळवी असे पाहुणे ठरले. दुर्दैवाने कुमार केतकर हे मुंबईहून निघण्याआधी कांही अप्रिय घटनेमूळे ठाण्यात तणाव निर्माण झाला. स्टेशनपासून परत घरी गेले. राज काझी यांच्या घरी जवळचे नातेवाईक वारले. ते ही आले नाहीत. आयोजक संयोजक म्हणून काय काय तणाव असतो ते जाणवतं होते. मोठा पेच समोर होता. ऐनवेळी इतिहास तज्ज्ञ व लातूरच्या बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य व वक्तृत्वाची तोफ समजले जाणारे डॉ. सोमनाथ रोडे व साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य, खान्देशातील आदिवासी समाजातील मराठीचे साहित्यिक व कवी संमेलनाचे अध्यक्ष वाहरू सोनवणे यांच्या उपस्थितीत तो पार पडला. मग अवचट व दळवी येणार की नाही? अशी शंका मनात आली पण ते दोघेही उपस्थित राहिले.
दोन दिवस कार्यक्रम पार पडले. उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, बालआनंद मेळावा, महिला मेळावा, उतरा केळकर यांच्या गीतांची मैफल, तिसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी परिषद, कृषी प्रदर्शन, पार पडले. डॉ. अनिल अवचट बाबा सकाळीच ट्रेनने लातूर व लातूरहून अंबाजोगाईला आले. व अजित दळवी दुपारी औरंगाबादहून आले होते. ठरल्या प्रमाणे सगळी व्यवस्था झाली होती. बालाजी व लोहिया दाम्पत्य त्यांच्या सेवेत होते. दुपारी चारच्या सुमारास अचानक माझ्या आईची तबेत बिघडली. तेंव्हा मी समारोप सत्राच्या कार्यक्रमाच्या आखनीत व्यस्त होतो. तसाच मी तिला घेऊन माझ्या फॅमिली डॉक्टर ह्या डॉ. शुभदा लोहिया ह्याच होत्या. त्यांच्याकडे गडबडीने घेऊन गेलो. तिला हृदयाला संसर्गाचा त्रास होता. तिला औषधें चालू होती पण कांही तरी प्रॉब्लेम झाला. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. सर्व तपासण्या झाल्या. आणि लगेच आशा आयसीयू मध्ये दाखल केले. तोपर्यंत पाच वाजले होते. तिकडे कार्यक्रमाची तयारी, त्याची चिंता. इकडे आईची चिंता. तोपर्यंत नातेवाईक, मित्र व सहकारी जमा झाले. आईला कृत्रिम श्वासयंत्रावर ठेवण्यात आले. थोडी स्थिरता आली होती. कांही सूचना करून माझ्या सहकाऱ्यांना कार्यक्रम सुरू होईल अशी व्यवस्था करण्यास सांगितले. माझे मार्गदर्शक भगवानराव शिंदे, गिरीधारी भराडीया, राजपाल लोमटे, सतीश लोमटे, इतर महत्वाचे लोक आलेले होतेच. तिकडे सर्वांनी कार्यक्रमाची तयारी केली. मी सर्वांना म्हणालो की, आपण कुठल्याही परस्थितीत कार्यक्रम सुरू करू. बालाजी सुतार हे माझ्या बाजूला गंभीरपणे उभे होते. त्यांना बाबांना घेऊन कार्यक्रमस्थळी जा अशी विनंती केली. ते गेले बाबांना कार्यक्रमस्थळी घेऊन जातो असे सांगून निघून गेले आणि चक्क बाबाच हॉस्पिटल मध्ये आले. मला धीरदेत ते आईला भेटले. डॉ.शुभदाशी बाजूला घेऊन विचारपूस केली आणि मी त्यांना कार्यक्रमस्थळी जाण्याची विनंती केली. सर्वांनी धीर दिला आईची प्रकृती स्थिर झाली आहे याची खात्री केली नंतर मला कार्यक्रमाला नेले. डॉ. शुभदा यांनीही खूप धीर दिला आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मी तिकडे गेलो. गंभीर वातावरण झालेले होते. लोक जमले होते. कांही लोक सोडले तर कुणालाच कांही माहीत नव्हते. बाबा, अजित दळवी यांना कल्पना होती. समारोप सत्रात यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्काराचे वितरण होणार होते. कृषी -जगन्नाथ तायडे, साहित्य -प्रा. तू. शं. कुलकर्णी, संगीत -पं. विश्वनाथ ओक व युवा गौरव -रवी बापटले यांना पुरस्कार होते. व्यासपीठावर सर्वांना घेऊन गेलो. स्वागतगीत, स्वागत झाले. कसेबसे प्रस्ताविक करून मी प्रसंग सांगून सर्वांची माफी मागितली व मी तिथून सरळ हॉस्पिटलमध्ये निघून गेलो. नंतर कर्यक्रम सुरू राहिला. मी हॉस्पिटलमध्ये जरी होतो तरी अर्धे लक्ष आईकडे व तगमग कार्यक्रमाकडेच होती. भावूक झालो होतो. ज्यांचं भाषण जवळ बसून ऐकायचे होते, काय बोलतात ते कान एकवटून ऐकायचे होते त्यास मी मुकलो होतो. हे दुःख एकीकडे व दुसरीकडे आईच्या तबेतीची चिंता. फोनवरती माहीती मिळत होती. बाबांचे भाषण छान झाले. आणि तू नाहीस याची खंत अनेकांना लागून राहिली ती सल आजही माझ्या मनात आहे. पण नाविलाज होता. कार्यक्रम संपल्यावर बाबा व दळवी परत मला भेटायला आले. धीर देत राहीले. रात्री राकेश चौरसिया यांची बासरी वादन व पं. विजय घाटे यांचा तबला व संहिता नंदी यांचं गायन, प्रमोद मराठे यांनी संवादिनी व पांडुरंग मुखडे यांनी तबल्याची साथ केली. मी कांही काळ या कार्यक्रमाला गेलो होतो. संहिता नंदी यांच्या भैरवीला स्वरांच्या वातावरणात त्या जसे स्वरांची उकल करीत होत्या तसे तसे मला रडू आवरेना. इतका दुःखद प्रसंग कधी आला नव्हता.
दुसऱ्या दिवशी आईची तबेत थोडी बरी झाली. सकाळी बाबांच्या भेटीला लोहियाकडे गेलो. बाबा हे लोहिया यांच्या मुलांना व शुभदा व अभिजित यांना ओरिगामीचे प्रयोग करत शिकवत होते. बालाजी माझ्याकडे खिन्नपणे पहात होता. मला समजूत घालून बाबा रात्री पुण्याला निघाले. जाताना अभिजित कडे पाहत म्हणाले माझी दोन दिवस काळजी घेतलीत. माझी आठवण म्हणून दगडूने दिलेले काचेचे स्मृतिचिन्ह मी तुला भेट देतो. त्याला पाहून माझी आठवण तुम्हा सर्वांना येत जाईल. ती आठवण ठेवून बाबा निघून गेले. मला न राहून त्यांचे भाषण ऐकायला मिळाले नाही ही खंत मनात ठेवून आईची काळजी घेत राहिलो. ३० नोव्हेंबरला पुण्यातून फोन करून आईची तबेत विचारली. नंतर खूप दिवस माझे बोलणे झालेच नाही. ४ डिसेंबर रोजी आई पहाटे गेली. माझा जीव तुटून गेला. एवढं मोठं दुःख कधीअनुभवाला आलं नव्हतं.
नंतर पुण्यात जाणयेणं होत असे. मध्यंतरी मुक्ता टिळक ह्या सोमनाथ शिबिरात आल्या. नंतर आनंदवन व इतर पुणे परिसरातील संस्थासाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आनंदवन मित्र मंडळ स्थापन केले. कपडे, फर्निचर, अन्न, भांडीकुंडी असे इतर साहित्य गोळा करून गरजू संस्था व लोकांना वाटप करणे असा तो उपक्रम पाच वर्षे चालला. त्याचा वर्धापन दिन साजरा करत असू. मी या उपक्रमात सहभागी होत असे. शिबिरातील सदस्य त्यानिमित्त एकत्र येत. माहिती गोळा करणे व गरजूना साहित्य वाटप करणे. टिळक वाड्यात छोटी जागा टिळक यांनी उपलब्ध करून दिली होती. शैलेश टिळक यात सहभागी होते. एका वर्धापन दिनास बाबांना बोलावले होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘लहू का रंग एक है। अमीर क्या गरिब क्या।’ या गीताने झाली. ते गीत मी गायले होते. तेंव्हा त्यांनी लगेच बोलावून माझे कौतुकही केले होते. त्या नंतर २०१५ ला पत्रकार सिद्धेश सावंतला घेऊन त्यांना भेटलो. तीच पद्धत आधी परिचय. इतर चर्चा. मग ओरिगामी कला. डायनासोर, खेकडा, मासा असे रंगीत कागदा पासून बनवून आनंद घेतला व आम्हालाही तो आनंद दिला. मग बासरीचे सूर आळवून बाय म्हणणार.
नंतर कांही वर्षांनी ६ नोव्हेंबर २०२१ च्या दिवशी शरद पवार यांना पुण्यात बारामती हॉस्टेलवर भेटीला गेलो. आपसूकच पाय पत्रकार नगरकडे वळले. दीपक चांदणे सोबत होता. त्याला म्हटलं रामभाऊ जोशी १०० वर्षांचे झालेत. त्यांना भेटू. त्यांच्या भेटीनंतर बाबांचे घर गाठले. चल दोघांनाही भेटू? गेलो. रामभाऊ नाही भेटले. नुकतेच झोपले होते. खाली आलो बाबांच्या घराची बेल वाजवली. दरवाजा उघडला. बाबा बाहेरच्या टेबलवर बसले होते. पाहाताच मन घाबरले. बाबांची तबेत बरी दिसत नव्हती. संपूर्ण शरीर वाढलेले होते. त्यांना ओळख करून द्यावी लागली. मी दगडू लोमटे अंबाजोगाई. ते एवढंच बोलले. मला आता पूर्वी सारखं फार आठवत नाही. पण लोहिया काय म्हणतात? पाच मिनिटं कांही तरी बोललो. कोविड मूळे जास्त वेळ थांबायचं नाही असं ठरवून गेलेलो. निघतो म्हणालो तेवढ्यात मुक्ता आली. तिला परिचय करून दिला. मला तिलाही भेटायचं होत. कधी तरी व्यसनमुक्तीसाठी कुणाला तरी पाठवायचं होतं. तो संदर्भ दिला आणि परत निघालो. बाहेर आलो. दरवाजा लावला गेला. दरवाजावर तीच पाटी होती. जी पहिल्यांदा पहिली होती. पायऱ्या उतरताना मला पुन्हा पुन्हा प्रथम पाहिलेला दरवाजा आणि तीच पाटी सतत नजरेत येत होती. डॉ. अनिल अवचट.. ज्या नावाशी माझा ऋणानुबंध वाढला होता तो कृष्णा या इमारतीत आलो तेंव्हा पासून..!
–दगडू लोमटे, अंबाजोगाई
मोबाईल: 9823009512