# धक्कादायक: मतिमंद मुला-मुलींना विवस्त्र एकत्र अंघोळ घातल्याचा प्रकार उघड.

जटवाडा औरंगाबाद येथील मतिमंद शाळेच्या मुख्याध्यापकासह बारा जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद: जटवाडा येथील शरदचंद्र पवार निवासी मतिमंद विद्यालयातील मुला-मुलींना एकत्रित विवस्त्र अंघोळ घातल्याचा प्रकार मागील काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी बुधवार, 12 ऑगस्ट रोजी हर्सूल पोलीस ठाण्यात विद्यालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्याध्यापकासह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतिमंद मुलांच्या अधिकारांचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

समाज कल्याण निरीक्षक एस. डी. साळुंके या मार्चमध्ये या शाळेत तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी शाळेचे प्रवेशद्वार उघडे होते. तेथे सुरक्षा रक्षकही नव्हता. तसेच मुला-मुलींना विवस्त्र एकत्र अंघोळ घालण्यात येत होती. हे पाहून साळुंके व पथकाला धक्का बसला. त्यांनी याबाबत मुख्याध्यापकाकडे विचारणा केली असता, रोज अशीच अंघोळ घातली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा मुख्याध्यापक साजिद बादशहा पटेल, वसतिगृह अधीक्षक योगेश राठोड, काळजीवाहक राजेश महादेव निंबाळकर, मदतीस शेख जाकीर मंजूर, पहारेकरी संतोष पवार, समितीचे अध्यक्ष शौकत पठाण, उपाध्यक्ष राजू पवार, सचिव साजीद पटेल, संस्थाप्रमुख बादशहा पटेल आदी बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, समाज कल्याण निरीक्षक साळुंके यांनी पाहणी केली असता विद्यार्थ्यांना सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत काहीही खाण्यास दिलेले नव्हते. अंघोळीसाठीही थंड पाणी दिले जात होते. स्वयंपाक घरात धान्य भाजीपाला नव्हता. विद्यार्थी संख्येच्या तुलनेत गाद्या व पांघरूणही नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *