संग्रहित छायाचित्र
पुणे: पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये मजूर, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरू व इतर प्रकारच्या अडकलेल्या व्यक्तींना अत्यावश्यक सेवा सुविधांचा अभाव व काम बंद असल्यामुळे त्यांना त्यांच्या मूळगावी पाठविण्याबाबत केंद्र सरकारने आदेश दिले आहेत. त्या धर्तीवर पुणे पोलिसांच्या वतीने राज्याअंतर्गत व परराज्यातील प्रवासास परवानगी देण्यासाठी स्थानिक स्तरावर यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत मायग्रंट सेलची स्थापना होणार आहे. ही यंत्रणा राबविण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चनसिंह यांची निवड करण्यात आली आहे. तर समूह स्वरूपात राज्याअंतर्गत व परराज्यात प्रवासास परवानगी देण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिसांना देण्यात आलेल्या आदेशानुसार, मूळगावी जाण्याची इच्छा असणार्या व्यक्तीची माहिती त्यांच्या गट प्रमुखांच्या माध्यमातून पोलीस ठाण्याच्या स्तरावर घेण्यासाठी एक पोलीस निरीक्षक व चार पोलिस कर्मचारी नेमून पोलिस ठाण्यात एक स्वतंत्र मायग्रंट पासेस सेल तयार करण्याचे सूचित करण्यात आले आहे. अर्ज भरून घेताना अर्जासोबत वैद्यकीय प्रमाणपत्र व हमीपत्रही ससंबंधितांना द्यावे लागणार आहे. मूळ गावी जाऊ इच्छिणार्या व्यक्ती
ह्या कोरोना संक्रमनशील क्षेत्रामध्ये राहत नसल्याची खात्री पोलिस अधिकार्यांकडून घ्यावी लागणार आहे. हद्दीतील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, एनजीओ, कंपन्यांचे व्यवस्थापक यांच्या मार्फत बाहेरच्या राज्यात जाण्यासाठी विहीत केलेली प्रक्रिया कामगारपर्यंत पोहचवण्याचे व कामगारांची गटनिहाय विभागणी केलेल्या याद्या तक्त्याप्रमाणे भरून घेण्यास मदत घेण्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच बाहेरच्या राज्यात जाणार्या गटांच्या प्रमुखांसोबत समन्वय साधून त्यांना वाहतुकीची साधने उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्याचे व परराज्यात जाणार्या वाहनांसाठी एक ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी कामगारांना सामाजिक अंतर राखून बसवता येईल, अशी व्यवस्था करावी लागणार आहे.
पोलिस ठाण्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे परिमंडळीय पोलिस उपायुक्त यांच्याकडे परवानगीसाठी पाठविलेले अर्ज परवानगी प्राप्त झाल्यानंतर संबंधित गटप्रमुख यांना सूचना देऊन त्यांच्या प्रवासाच्या साधनाप्रमाणे त्यांना सामाजिक अंतर ठेवण्याबाबत सूचना देवून रवाना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पोलिस ठाण्यात अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याचे व सेलमध्ये काम करणार्या कर्मचार्यांना पीपीई कीट उपलब्ध करून द्यावे, कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी काळजी घेण्याचेही आदेश संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देण्यात अले आहेत.
पोलिस ठाण्याला अशा प्रकारचा सेल स्थापन झाल्याची खात्री करून त्यांना मागर्दशन करावे.पूर्व परवानगी मिळताच तात्काळी संबंधित गटाचा विहीत नमुन्यात पास देऊन पोलिस ठाण्याला त्यांना रवाना करण्यासंदर्भात सुचना द्याव्या लागणार आहे. भरण्यात आलेली एक्सल शिट वेळोवेळी अद्यावत ठेवून आयुक्तालयाच्या समन्वय अधिकार्यांना पाठवावी लागणार आहे.
दरम्यान, राबविण्यात येत असलेली प्रक्रिया नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी covid19.mhpolice.in या संकेतस्थळाचा वापर करण्याचे व विविध माध्यमातून जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संकेतस्थळावर मिळालेल्या अर्जावर नमूद केल्याप्रमाणे पासेस देण्याची व रवाना करण्याची प्रक्रिया राबवण्याचे व दुसर्या राज्यातील नोडल अधिकार्यांशी पत्रव्यवहार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाहेरील राज्यातून शहरात येण्यासाठी पास संदर्भात विचारणा झाल्यास सोबत आवश्यक माहिती भरून राज्याच्या जिल्हा व नोडल अधिकार्यांना ईमेल करण्याची प्रक्रिया करण्याचे सूचित करण्यात आले आहे.