नागपूरः विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीला जोरदार दणका देत भाजपने नागपूर आणि अकोल्यात विजय मिळवला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव केला. बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली तर मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचेही स्पष्ट झाले आहे.
नागपूरमध्ये विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, मंगेश देशमुख यांना १८६ तर छोटू उर्फ रवींद्र भोयर यांना १ मत मिळाले. या मतदारसंघात काँग्रेसने आधी रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार बदलून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला होता. काँग्रेसने शेवटच्या क्षणी उमेदवार बदलल्यामुळे या निवडणुकीतील चुरस वाढली होती.
अकोल्यातूनही भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत. त्यांना ४४३ मते मिळाली. या निवडणुकीत चौथ्यांदा उभे असलेले शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली. खंडेलवाल यांनी १०९ मतांनी त्यांचा पराभव केला. अंतर्गत गटबाजी आणि महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे भाजप उमेदवाराचा विजय झाला. या निवडणुकीत तब्बल ३१ मते बाद झाली आहेत.