पुढील प्रवासासही अनुकूल स्थिती
पुणे: मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होणार आहे. त्यानंतर लागलीच पुढील प्रवास सुरू होण्यास स्थिती अत्यंत पोषक आहे. ही माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली.
बंगालच्या उपसागरासह अंदमान, निकोबार बेटे तसेच श्रीलंकेजवळ 22 मे रोजी जोमदारपणे दाखल झाला. मात्र, त्यानंतर अरबी समुद्रात ‘तोक्ते’ तर काही दिवसांच्या अंतराने बंगालच्या उपसागारापासून ते ओडिशाच्या किनारपट्टीपर्यंत ‘यास’ चक्रीवादळ धडकले होते. त्यामुळे मान्सूनचा प्रवास थंडावला होता. मात्र, आता चक्रीवादळे पूर्णपणे शमली आहेत. त्यामुळे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर अंदमान व निकोबार बेटांवर स्थिरावलेल्या मान्सूनला गती देण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे केरळच्या किनारपट्टीपर्यंत 31 मे रोजी मान्सून दाखल होण्यास अतिशय अनुकूल स्थिती आहे. मान्सून पुढे सरकण्यास स्थिती पोषक आहे. त्यामुळे केरळवर मान्सून दाखल होताच पुढील प्रवास लवकर सुरू होण्याची चिन्हे आहेत.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या सोळा वर्षांपासून म्हणजेच सन 2005-2020 या कालावधीत हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा वर्तविलेला अंदाज खरा ठरलेला आहे.
हवामानशास्त्र विभागाने आतापर्यंत वर्तविलेला अंदाज आणि प्रत्यक्षात केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या तारखा आणि वर्ष पुढीलप्रमाणे:
वर्ष– मान्सून दाखल– मान्सून दाखलबाबतचा अंदाज
2016– 8 जून—- 7 जून
2017– 30 मे—- 30 मे
2018– 29 मे—- 29 मे
2019– 8 जून—- 6 जून
2020– 1 जून—- 5 जून