मान्सूनची आगेकूच सुरू; अंदमान, निकोबार बेटांचा भाग व्यापला

पुणे: अनुकूल स्थितीमुळे मान्सूनची आगेकूच सुरूच असून, मंगळवारी बंगालच्या उपसागरातील पूर्व मध्य भागाकडे कूच केले आहे. तसेच अंदमान व निकोबार आणि आसपासचा भाग व्यापला आहे. दरम्यान केरळ, कर्नाटक, आसाम, मेघालय व अरूणाचल प्रदेशात अतिवृष्टी सुरू असून, मध्य भारतात मात्र अजुनही उष्णतेची तीव्र लाट आहे.

मान्सून अंदमान व बंगालच्या उपसागरात 16 मे रोजी दाखल झाला. अनुकूल स्थितीमुळे त्याने 24 तासात अंदमाना, निकोबार आणि उर्वरित सर्व बेटं काबीज केली असून, पुढील 48 तासात बंगालच्या उपसागरातील पूर्व मध्य भाग व्यापणार आहे. तर अंदमान निकोबार बेट काबीज केल्यानंतर आता केरळच्या दिशेने आगेकूच करेल. दरम्यान केरळ, कर्नाटक, लक्षव्दीप, अंदमान, निकोबार, तामिळनाडू, हिमालयाचा पायथा, आसाम, पश्चिम बंगाल, अरूणाचल प्रदेश, त्रिपुरा, रॉयलसीमा या भागात  अतिवृष्टी सुरू असून, 100 ते 350 मि.मी पाऊस पडत आहे. अजुन दोन दिवस याच वेगाने या भागात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य पाकिस्तान व मध्य राजस्थान, या भागात पश्चिमी चक्रावात सक्रीय झाल्याने जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला आहे. हा पाऊस पंजाब, हरियाणा, पंश्चिम राजस्थान या भागातही बरसत आहे.

या भागात उष्णतेची तीव्र लाट: उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेश, पंजाब हरियाणा या भागात दोन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे.

राज्यात या भागात यलो अलर्ट: रत्नागिरी,सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली,  परभणी, हिंगोली, नागपूर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, वर्धा, यवतमाळ,चंद्रपूर या भागात चार दिवस  यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *