पुणे: अनुकूल स्थितीमुळे अत्यंत वेगाने प्रवास करीत शनिवार, 5 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. दक्षिण कोकणातील हर्णे, दक्षिण मध्यमहाराष्ट्रातील सोलापूर आणि मराठवाड्याच्या काही भागात मान्सून पोहचला आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्यामुळे 24 तासात राज्याचा उर्वरित भागातही मान्सून पोहचेल. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
वातावरण पोषक असल्यामुळे दोन दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल झाला आहे. शनिवारी मान्सून राज्यात कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, सातारा, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाला आहे. या वर्षी मान्सून अंदमान बेटांवर एक ते दोन दिवस उशिराने दाखल झाला. त्यानंतर तोक्ते चक्रीवादळ आणि लागलीच बंगालच्या उपसागरात तयार झालेले यास या दोन चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावला होता. मान्सून नियमित वेळेच्या आधी म्हणजेच 31 मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता होती. परंतु आवश्यक असलेल्या वा-यांची स्थिती पोषक नसल्यामुळे मान्सूनचे केरळमधील आगमन लांबले. 3 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल झाला. मात्र, त्यानंतर दुस-याच दिवशी वेगाने वाटचाल करीत मान्सून संपूर्ण केरळ, कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांश भाग, अंतर्गत भाग, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, त्याचबरोबरच बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व, उत्तर आणि दक्षिणेडील बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे.
वाटचालीस पोषक वातावरण असल्यामुळे दोन दिवस मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गोव्यासह दक्षिण महाराष्ट्रात मान्सून ऐरवी सर्वसाधारणपणे 7 जूनच्या आसपास दाखल होत असतो. शनिवारी मान्सूनचे पूर्ण कर्नाटक, महाराष्ट्राच्या काही भागात प्रगती केली आहे. याबरोबरच कर्नाटकामधील कर्नुल, तिरूपती, कुड्डालोरपर्यंत मान्सूनने मजल मारली आहे.
मुंबई, ठाणे, रायगडसह मराठवाड्यात यलो अर्लट
सध्या मध्य पूर्व अरबी समुद्र ते कर्नाटकची किनारपट्टी आणि दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह, मेघगर्जनेत पाऊस पडणार असून, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या भागात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.