मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी
पुणे: मान्सून शुक्रवारी निकोबार बेटासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग तसेच दक्षिण अंदमानाच्या अंतर्गत भागात दाखल झाला आहे. मान्सून पुढे सरकण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील 48 तासात बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम व पूर्व भागासह संपूर्ण अंदमान समुद्र, अंदमान समुद्र आणि मध्यपूर्व बंगालच्या उपसागरात दाखल होणार आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या पूर्व भागापासून ते कर्नाटकच्या उत्तर भागापर्यंत मध्य प्रदेशचा पूर्व भाग, विदर्भ पार करून कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्यामुळे 25 ते 26 मे रोजी मध्य महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार अंदमान, निकोबार बेटांच्या आसपासच्या भागासह बंगालच्या उपसागरातील काही भागात मान्सून पोहचण्यास अनुकूल वातावरण आहे. या वातावरणामुळे म्हणजेच कमी दाबाचे वाढलेले पट्टे आणि चक्रीवादळाच्या स्थितीमुळे अगदी वेळेवर निकोबार बेटासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग तसेच दक्षिण अंदमानच्या अंतर्गत भागात मान्सून दाखल दाखल झाला आहे. सध्या या भागात आगमनातच या भागात पाऊस सुरू झाला आहे. दरम्यान पोषक स्थितीमुळे मान्सून पुढे सरकण्यास अतिशय चांगले वातावरण आहे. परिणामी पुढील 48 तासात बंगालच्या उपसागरातील दक्षिण पश्चिम व पूर्व भागासह संपूर्ण अंदमान समुद्र, अंदमान समुद्र आणि मध्यपूर्व बंगालच्या उपसागराचा भाग व्यापणार आहे.
22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होणार
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व आणि दक्षिण भागासह उत्तर अंदमान भागात 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या पट्ट्याचे 24 मे रोजी ‘चक्रीवादळा’त रूपांतर होणार असून ते 26 मे रोजी ओडिशा व पश्चिम बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर पोहचणार आहे. या चक्रीवादळामुळे अंदमान समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात 21 ते 26 मे दरम्यान मच्छीमारानी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.