पुणे: गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात मुक्काम ठोकून असलेला मान्सून आता मात्र दोन दिवसात परतीचा प्रवास सुरू करणार आहे. दरम्यान, आता पावसाचा जोर राज्यात कमी झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली.
राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, संपूर्ण जून आणि जुलै महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत पावसाने राज्यात हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतक-यांसह नागरीक देखील चांगलेच हैराण झाले होते. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर महिना संपत आला तरी कोसळतच होता. हवामान विभागाने 28 सप्टेंबर पासून देशातून मान्सून परतीचा प्रवास करेल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पश्चिम राजस्थानपासून मान्सूनने परतीचा प्रवास करण्यास सुरूवात केली. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झाले. या पट्ट्यांचे रूपांत अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले. त्यामुळे राज्यात पाऊस वाढला. शिवाय मान्सूनचा परतीचा प्रवास देखील आहे त्याच जागेवर थांबला.
आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे झारखंड, छ्त्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर व मध्य अरबी समुद्र, ओडिशाचा काही भाग, पश्चिम बंगाल सिक्कीम, तेलंगण तसेच ईशान्य भारतातील सर्वच राज्य आणि महाराष्ट्रामधून दोन दिवसात मान्सून परतीचा प्रवास करण्यास सुरूवात करणार आहे. राज्याच्या सर्वच भागातून मान्सून एकाच वेळी परतणार आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तसेच ऑक्टोबर हिटचा तडाखा देखील वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
थंडीची चाहूल: देशातून दोन दिवसात मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार आहे. त्यानंतर लागलीच थंडी सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. देशात थंडी सुरू होण्यासाठी आवश्यक असलेला पश्चिमी चक्रावात सध्या उत्तर पाकिस्तान, जम्मू काश्मीर आणि पंजाब प्रांतावर आहे.