मोरपीस आणि पिंपळपान: कवी दुर्गेश सोनार यांच्या हायकू संग्रहाचे प्रकाशन
मुंबई: ‘हायकूचा संग्रह म्हणजे चमचमणारी काजव्यांची पालखी’, असे उद्गार ख्यातनाम कवी अशोक बागवे यांनी काढले. सुप्रसिद्ध कवी आणि ज्येष्ठ पत्रकार दुर्गेश सोनार यांच्या ‘मोरपीस आणि पिंपळपान’ या हायकू संग्रहाचे प्रकाशन नुकतेच झाले, त्यावेळी ते बोलत होते.
हायकूचा आत्मा म्हणजे निसर्ग आणि भावना यांचा प्रदीप्त झालेला क्षण पकडणे, असे मत त्यांनी व्यक्त केले. हायकू हे अर्ककाव्य आहे असे म्हणत या काव्य प्रकाराचे त्यांनी विवेचन केले. सुवचनाची ताकत हायकूत असते, असे म्हणतानाच त्यांनी दुर्गेश सोनार यांनी या काव्यसंग्रहातून सर्व निर्गुण सगुण केले. असे गौरवोद्गार काढले.
कविला स्वतःला आजमावून पाहायचे असेल तर कविने हायकू लिहून पाहावे, असे ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगावकर म्हणाले. या हायकू संग्रहाची प्रस्तावनाही साळेगावकर यांनी लिहिली आहे. आपल्या भाषणात त्यांनी हायकू या काव्यप्रकाराचा इतिहास सादर केला. तरलता हे हायकूचे मर्म असते, असे ते म्हणाले.
कवी नितीन देशमुख, भरत दौंडकर यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. कवी दुर्गेश सोनार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. हायकूची वाट कशी गवसली याचा उलगडा सोनार यांनी आपल्या मनोगतातून विशद केला. हायकू संग्रहातील निवडक हायकूंचे वाचनही त्यांनी यावेळी केले.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर हा प्रकाशन सोहळा ऑनलाईन माध्यमातून पार पडला. अस्मिता चांदणे आणि दीपक चांदणे यांच्या प्रतिमा प्रकाशनाने हा हायकूसंग्रह प्रकाशित केला आहे. सरदार जाधव यांचे मुखपृष्ठ आहे.