नवी दिल्लीः एमआयएमचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारने देऊ केलेली सीआरपीएफची झेड सुरक्षा स्वीकारण्यास नकार दिला आहे. शुक्रवारी लोकसभेत बोलताना त्यांनी आपणाला झेड श्रेणीची सुरक्षा नको असल्याचे सांगितले. त्याऐवजी त्यांनी हल्लेखोरांवर यूएपीए अंतर्गत गुन्हे का दाखल केले जात नाहीत? अशी विचारणा केंद्र सरकारकडे केली आहे.
खा. ओवेसी हे गुरूवारी मेरठहून दिल्लीला परत येत असताना उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये त्यांच्या कारवर गोळीबार झाला होता. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. खा. ओवेसींवरील या हल्ल्यानंतर त्यांना केंद्र सरकारने सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली.
खा. ओवेसी यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराबाबत त्यांनी शुक्रवारी लोकसभेत काही खुलासे केले. सुमारे सहा वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४ वरील हापूर-गाझियाबाददरम्यान छिजारसी टोल प्लाझाजवळ झालेल्या हल्ल्याच्या आधी दोन लोकांनी त्यांची रेकी केली होती. ज्यांचा बॅलेटवर नाही तर बुलेटवर विश्वास आहे, असे ते लोक कोण आहेत? ते लोक कोण आहेत, जे एवढे कट्टरपंथी आहेत की त्यांचा आंबेडकरांच्या संविधानावरही विश्वास नाही, असा माझा सवाल आहे, असे ओवेसी म्हणाले.
तरूणांतील कट्टरतावाद देशासाठी धोका आहे. जे लोकांना कट्टरपंथी बनवत आहेत, त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हे का दाखल केले जात नाहीत? जर कोणी प्रक्षोभक भाषण देत असेल तर त्याच्याविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला जात नाही. परंतु क्रिकेट सामन्यावर प्रतिक्रिया देणाऱ्याला मात्र या कठोर कायद्याचा सामना करावा लागतो, असेही खा. ओवेसी म्हणाले.
दहशतवादविरोधी कठोर कायद्याचा उल्लेख करून खा. ओवेसी म्हणाले की, मला झेड श्रेणीची सुरक्षा नको आहे. मी तुमच्या सर्वांप्रमाणे ए श्रेणीचा नागरिक बनू इच्छितो. माझ्यावर गोळ्या झाडणाऱ्याविरोधात यूएपीए का लावण्यात आला नाही? मी जगायचे आहे, मला बोलायचे आहे. गरीब सुरक्षित झाला तरच माझेही जीवन सुरक्षित राहील. ज्या लोकांनी माझ्या कारवर गोळ्या झाडल्या त्या लोकांना मी घाबरणार नाही, असेही खा. ओवेसी संसदेत म्हणाले.
यूएपीए कायद्याचा भाजपच्या नेतृत्वातील केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकारांनी मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. त्याचाच संदर्भ देत खा. ओवेसी यांनी त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल का करत नाही?, अशी विचारणा करत केंद्र सरकारला धारेवर धरले.
खा. ओवेसी यांच्यावर गुरूवारी झालेल्या गोळीबारप्रकरणी एमआयएमचे प्रतिनिधी यामीन खान यांच्या फिर्यादीवरून पिलखुआ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गौतबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपूरचा रहिवासी सचिन शर्मा आणि सहारनपूर जिल्ह्यातील सापला बेगमपूरचा रहिवासी शुभम या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी हल्ल्यासाठी वापरलेली हत्यारेही जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी दिली.