औरंगाबादः भाजपचे नवनियुक्त राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांच्या दोन मुलांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या कारणावरून भाजयुमोचाच पदाधिकारी असलेल्या बांधकाम ठेकेदाराला घरात घुसून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्यात खासदार डॉ. भागवत कराड यांची दोन मुले हर्षवर्धन आणि वरूण हे पवन सोनवणे हा कार्यकर्ता हे तिघेही भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि बांधकाम ठेकेदार कुणाल मराठे यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे.
भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि बांधकाम ठेकेदार कुणाल मराठे हे कोटला कॉलनी येथे राहतात. समता नगरमध्ये कोरोनाचे रूग्ण सापडल्यानंतर कुणाल मराठे यांनी शनिवारी या वॉर्डात निर्जंतुकीकरण करून घेतले. त्यानंतर मराठे हे त्याच दिवशी रात्री १० वाजता घरात कुटुंबासह जेवण करत असताना त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावण्यात आला. दरवाजा उघडल्यानंतर खासदार डॉ. भागवत कराड यांची दोन मुले हर्षवर्धन आणि वरूण हे पवन सोनवणे या कार्यकर्त्यासह मराठे यांच्या घरात घुसले. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचे तिकिट मलाच मिळणार असल्यामुळे मीच लोकांना मदत करतो. तू वॉर्डात फिरायचे नाही आणि लोकांना कोणतीही मदत किंवा कुठलेही काम करायचे नाही, अशी दमबाजी या तिघांनी कुणाल मराठे यांना केली आणि त्यानंतर तिघांनी मिळून मराठे यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या पुढे वॉर्डात फिरलास तर तुला ठार मारू, अशी धमकीही या तिघांनी दिल्याचे कुणाल मराठे यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
हर्षवर्धन, वरूण कराड आणि पवन सोनवणे हे तिघे मिळून कुणाल मराठे यांना बेदम मारहाण करत असताना कुणाल यांच्या कुटुंबाने मध्ये पडून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान कुणाल मराठे हे आतल्या खोलीत गेल्याने या तिघांच्या तावडीतून बचावले. कुणाल मराठे यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिसांनी हर्षवर्धन आणि वरूण कराड या दोन खासदारपुत्रांसह पवन सोनवणे यांच्यावर आज रविवारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे.