अमर हबीब, प्रा.डॉ. अलका वालचाळे, प्रा. देविदास खोडेवाड यांचा समावेश; ऑगस्ट मध्ये १० व्या साहित्य संमेलनात वितरण
अंबाजोगाई: मराठवाडा साहित्य परिषद शाखा अंबाजोगाईचे दर दोन वर्षांनी दिले जाणारे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे दिवंगत संमेलनाध्यक्ष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिले जातात. येत्या ऑगस्ट महिन्यात १० व्या साहित्य संमेलनात हे पुरस्कार वितरित केले जातील. मंदाताई देशमुख स्मृती कथा लेखक पुरस्कार अमर हबीब यांना, प्राचार्य डॉ. शैलताई लोहिया स्मृती लेखिका पुरस्कार प्रा. डॉ. अलका सरोदे – वालचाळे यांना तर प्राचार्य डॉ. संतोष मुळावकर शिक्षक साहित्य पुरस्कार प्रा. देविदास खोडेवाड यांना मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे व सचिव गोरख शेंद्रे यांनी जाहीर केले आहेत.
अमर हबीब हे मुक्त पत्रकार, शेतकरी आंदोलन, किसानपुत्र आंदोलन यात महत्वाचा सहभाग, परिसर प्रकाशनाच्या वतीने अनेक महत्वाचे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. अनेक चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून नाते, कलमा, खरी कमाई हे कथासंग्रह प्रकाशित आहेत. अंबाजोगाईची कथा या कथासंग्रहाचे संपादन केळलेला ग्रंथ ९ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात आले असून संवाद, आकलन, आदी लेख संग्रह आहेत तर धुनी तरुणाई हे चळवळी आधारित ग्रंथ संपादित केला आहे. त्यांना मंदाताई देशमुख स्मृती कथा लेखक पुरस्कार दिला जाणार आहे.
प्रा. अलका वालचाळे ह्यानी महिला महाविद्यालयात मराठीचे अध्यापन केले आहे. त्यांची समकालीन मराठी जैन कथा, जैन मराठी साहित्य – स्वरूप आणि आकलन व मराठी जैन काव्यधारा ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना प्राचार्या डॉ. शैलाताई लोहिया स्मृती लेखिका पुरस्कार दिला जाणार आहे.
प्रा. देविदास खोडेवाड हे खोलेश्वर महाविद्यालयात मराठी भाषेचे अध्यापन करतात. त्यांचे महाराष्ट्रातील आदिवासी समाज जीवन (संशोधन ग्रंथ), पुन्हा उलगुलान (कवितासंग्रह), जखमा (कवितासंग्रह) व वैचारिक मराठी साहित्य: शोध ,स्वरूप व अभिव्यक्ती (संपादकीय) हे ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांना प्राचार्य डॉ. संतोष मुळावकर स्मृती शिक्षक लेखक पुरस्कार प्रदान केले जातील.
पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पहार व दोन हजार रुपये रोख असे आहेत. येत्या ऑगस्ट महिन्याच्या १९,२० व २१ तारखेला मसाप शाखा अंबाजोगाईचे १० वे अंबाजोगाई साहित्य संमेलन संपन्न होणार असून या संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, अशी माहितीही मसाप अंबाजोगाई अध्यक्ष दगडू लोमटे यांनी दिली आहे.