नांदेड: जिल्ह्यात अनेक महत्त्वाची ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत. यामध्ये मुखेड येथील दशरथेश्वराच्या मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. याला श्रावण महिन्यात विशेष महत्त्व प्राप्त होते.
जिल्ह्यात चालुक्य- यादव कलेचा आढावा घ्यावयाचा झाल्यास तो मुखेड येथील अप्रतीम देवालयाच्या संदर्भाशिवाय अपुरा राहतो. दशरथेश्वराचे देवालय हे यादव स्थापत्य-शिल्प कलेचा श्रेष्ठतप अविष्कार ठरावा. मंदिर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे आणि बरेचसे शिल्पवैभव आपले कलासौंदर्य कायम टिकवून आहे. बाह्य भिंतीवरील मूर्तीशिल्पे उल्लेखनीय आहेत.
विशेषतः सप्तमातृका शिल्प अधिक रेखीव ठरावीत. नृत्यगणेश, विष्णूलक्ष्मी, अर्धनारीनटेश्वर आदी मूर्तीशिल्पांचा उल्लेख महत्वाचा. मंदिराचे स्थापत्य, यादव कलास्थापत्य परंपरेचे सातत्य दर्शविणारे तर शिल्पकला चालुक्यांचा प्रभाव व्यक्तविणारी. महामंडपातील खांबावरील शिल्पकारीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. या देवलयातील कलेचा आविष्कारच एवढा समर्थ आहे की, या कलेचा मूळस्तोत्र आणि परंपरा स्पष्टपणे लक्षात याव्यात.
यादव, चालुक्य काळातील कुठलाही शिलालेख आजूनपावेतो येथे सापडला नसल्याने कलापरंपरा हाच या अभ्यासाचा प्रमुख आधार राहणार आहे.
नांदेडपासून 70 किलोमीटर अंतरावर मुखेड हे तालुक्याचे ठिकाण असुन जुन्या वस्तित हे शिवालय असून शेजारी भव्य अशी बारवदेखील आहे. गाळ काढून साफसफाई करुन स्वच्छ केल्यास येथील पाण्याचा उपयोग होवू शकतो.
ऐतिहासिक माहिती: डाॅ.प्रभाकर देव
छायाचित्रे: विजय होकर्णे, नांदेड