मुंबई: मुंबई बँकेतील (मुंबै बँक) गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. त्यामुळे मुंबई बँकेचे अध्यक्ष असलेले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. सहकार आयुक्तांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशीसाठी सहकार विभागातील ३ अधिकार्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बँकेला झालेल्या ४८ कोटी रुपयांच्या तोट्याची चौकशी होणार आहे.
खालील मुद्द्यांवर होणार चौकशी:
1)बँकेने शासनाच्या हमीवर साखर कारखान्यांना दिलेले कर्ज.
2)बँकेने दिलेल्या कॉर्पोरेट कर्ज खात्यांची चौकशी.
3)गृहनिर्माण संस्थांना स्वयंपुर्नविकास धोरणांतर्गत दिलेल्या कर्जाची चौकशी.
4)बँकेचे मुख्यालय व शाखांच्या दुरुस्तीवर झालेला खर्च.
5)मागील पाच वर्षात संगणकीय प्रणाली अद्ययावत करणे, संगणक खरेदी यासाठी केलेल्या खर्चाची चौकशी.
6)भांडवलात घट होऊन ते ७.११ टक्के कसे झाले, या सर्व प्रकरणात मुंबई बँकेची चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.
यापूर्वीही पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार दाखल:
यापूर्वीही मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर आणि इतर संचालक मंडळाविरोधात भाजपचे विवेकानंद गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती. खातेदारांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचाही आरोप करण्यात आला होता. तर नाबार्डनेही मुंबई बँकेच्या कर्ज वितरणात अनियमितता असल्याचा ठपका ठेवला होता.