पुणे: ओबीसी आरक्षणाशिवाय महाराष्ट्रामध्ये नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत हा खरंतर ओबीसी समाजावर होणारा अन्याय आहे. निवडणूक आयोग सुद्धा ओबीसींला डावलून निवडणुका घेण्याचे पाप करत आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका घ्याव्यात अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. अन्यथा इथून पुढच्या सर्व निवडणुका रद्द करण्यात याव्यात अशी ठाम भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी मांडली आहे.
१) मागासवर्गीय आयोगाच्या वतीने जातनिहाय करण्याचे काम चालू आहे. मात्र ही जनगणना चुकीच्या पद्धतीने सुरू असून यामध्ये ओबीसी जातींवर अन्याय होण्याची शक्यता आहे. कारण मागासवर्ग आयोगाच्या वतीने एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात आडनावावरून जनगणना केली जात आहे. एका आडनावाचे बऱ्याच वेगवेगळ्या जातीमध्ये लोक असतात, त्यामुळे सरकार चुकीच्या पद्धतीने जनगणनेचा अहवाल स्वीकारणार असेल तर हे कदापिही योग्य होणार नाही.
२) नगरपालिकेच्या निवडणुका ओबीसींना घेऊन व्हाव्यात अशी संभाजी ब्रिगेड ची भूमिका आहे. मात्र जर इम्पेरिकल डाटा गोळा होणार नसेल तर मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसींवर अन्याय करून घेणार का…? मुख्यमंत्री व राज्य सरकार यांनी याकडे गांभीर्याने घ्यावे व सदर निवडणुका सध्या रद्द कराव्यात.
३) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थात भाजपची सत्ता स्थापन करण्यात आलेली आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यापासून दोन अडीच वर्षात केंद्र सरकारने 2011 चा इम्पेरियल डेटा महाराष्ट्र सरकारला देण्यास मनाई केली होती. मात्र आता त्यांचे सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्राकडून इम्पेरियल डेटा घेऊन तो मा. सर्वोच्च न्यायालयात सादर करावा व ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे ते सुरळीत करावे आणि त्यानंतरच त्या ठिकाणी निवडणुका घ्याव्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत गंभीर विचार करावा. भाजप ओबीसी आघाडीच्या वतीने अडीच वर्ष खोटे आंदोलनं करण्यात आली होती. आता त्यांनी या गोष्टींमध्ये सदोष पद्धतीचा अवलंब करून ओबीसींच्या राजकीय आरक्षण वाचवावे अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.
महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात संभाजी ब्रिगेड अत्यंत गंभीर असून ओबीसी आरक्षणाशिवाय नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ देणार नाही. या विरोधात महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचेही संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.