मृतांत आई-वडिलांसह 10 वर्षीय चिमुकलीचा समावेश
औरंगाबाद: पैठण शहरातील कावसान येथील पती, पत्नी व मुलीचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार, 28 नोव्हेंबर च्या पहाटे घडली. संपूर्ण कुटुंबाला संपवण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैठण शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कावसान येथील राजू उर्फ संभाजी निवारे (35), पत्नी अश्विनी निवारे (30) व मुलगी सायली निवारे (10) यांचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात मुलगा सोहम (6) हा बचावला असून त्यास औरंगाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, सहायक पोलीस अधीक्षक गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह पैठण येथील सरकारी दवाखान्यात पोस्ट मार्टम साठी पाठवण्यात आले. दरम्यान, श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याच्या सूचना पोलिस यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.
तपासासाठी पथके तैनात: घटनेचा तपास योग्य दिशेने सुरू असून ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, सहायक पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. विविध ठिकाणी पोलीस यंत्रणा वेगाने तपास करत असून लवकरच आरोपींना जेरबंद करू, असा विश्वास पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार यांनी व्यक्त केला आहे.
पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा अंदाज: जुन्या भांडणातून संपूर्ण कुटुंबाला संपवण्यासाठी हल्लेखोरांनी कट रचला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामध्ये हल्लेखोरांनी घरात घुसून संपूर्ण कुटुंबाच्या तोंडावर स्प्रे मारून बेहोश करून हत्या केल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यात, मयत निवारे यांच्या अंगावरील सोने, हातातील अंगठ्या यापैकी काहीही चोरीला गेले नाही. त्यामुळे या हत्या पूर्व वैमनस्यातून झाल्या असाव्यात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.