पुणे: दै. पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे (बाबा) यांचे गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वा. निधन झाले. पुणे जिल्ह्यातील उंब्रज नं – १ (ता. जुन्नर) त्यांचे मुळगाव आहे.
दैनिक पुण्यनगरी, आपला वार्ताहर, मुंबई चौफेर, यशोभूमी, कर्नाटक मल्ला या वर्तमानपत्रांची शिंगोटे यांनी मुहूर्तमेढ रोवली. वृत्तपत्र वितरक ते संस्थापक या वाटचालीत त्यांनी वृत्तपत्रसृष्टीत बहुमोल योगदान दिले. शिंगोटे यांनी विविध भाषांत वृत्तपत्रं सुरू करीत ती नावारुपास आणली.
वर्तमानपत्राचा विक्रेता ते मोठ्या माध्यम समूहाचे मालक संस्थापक-संपादक अशा अनेक मोठ्या भूमिका निभावणारे बाबांचे जाणे वृत्तपत्र सृष्टीतील मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील असंख्य तरुणांचे वृत्तपत्र व्यवसायाच्या माध्यमातून संसार उभे करण्यात बाबांचे मोठे योगदान आहे. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने २०१६-१७ मध्ये गौरविण्यात आले होते. वृत्तपत्र विक्रेता ते महाराष्ट्रातील नावाजलेल्या वृत्तपत्र समूहाचे मालक असा त्यांचा प्रवास मराठी माणसाला निश्चितच प्रेरणादायी व थक्क करणारा आहे.