# ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ कार्यक्रमातून शहिदांना संगीतमय आदरांजली…

नांदेड: नसानसातून वाहणाऱ्या देशभक्तीच्या उर्मीस चेतना देणारा सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम शनिवारी रात्री शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडला. मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी या देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या १३ वर्षापासून होत आहे. महाराष्ट्रात गाजलेले कलावंत रविंद्र खोमणे, मनव्वर अली, मालविका दीक्षित आणि पत्रकार विजय जोशी यांच्या एकापेक्षा एक देशभक्तीपर गितांनी हा कार्यक्रम पार पडला.

जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक यशवंत काळे, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत हे उपस्थित होते.

अशा देशभक्तीच्या कार्यक्रमामुळे देशप्रेमाची भावना तर निर्माण होतेच सोबत शहीदांचे स्मरण करताना त्यांच्या त्यागाची आठवण नव्या पिढीला व्हावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम पत्रकार विजय जोशी यांनी सुरु ठेवल्याबद्दल जिल्हाधिकारी व पोलीस उपमहानिरीक्षकांनी कौतुक केले. उद्घाटकीय सत्राचे संचलन विजय बंडेवार आणि गजानन पिंपरखेडे यांनी केलेले. कार्यक्रमाच्या मागची भूमिका पत्रकार विजय जोशी यांनी विषद केली. पुढील वर्षीच्या कार्यक्रमात गाणे म्हणण्याची तयारी आपण आजच सुरु करत आहोत, असा सुखद धक्का जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. त्यानंतर हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

महिला वाद्यवृंदाच्या तसेच दिग्गज वादकांच्या उपस्थितीत तब्बल तीस कलावंतांनी देशभक्तीपर विविध रचना सादर केल्या. ‘सुर नवा ध्यास नवा’, या कार्यक्रमात गाजलेल्या मनव्वर अली यांनी तेरी मिठ्ठी, परवर दिगार, मा तुझे सलाम, ऐ वतन ऐ वतन मेरे या रचना सादर केल्या. मालविका दीक्षित यांनी सैनिक हो तुमच्यासाठी, देश रंगीला, वंदे मातरम या रचना सादर करुन रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. प्रख्यात गायक रविंद्र खोमणे यांनी  जिंदगी मौत ना, संदेशे आते है, मेरा रंग दी बसंती या रचना सादर केल्या. जहाँ डाल डाल पर, कर चले हम फिदा या दोन रचना प्रख्यात गायक आनंद लांडगे यांनी सादर केल्या. शूर आम्ही सरदार, गर्जा महाराष्ट्र माझा, म्यानातून उसळे आणि जयस्तुते या आगळ्यावेगळ्य एकत्रित केलेल्या देशभक्ती रचनांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेवटी मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रख्यात निवेदक महेश अचिंतलवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *