तू ठोकतोस छाती गर्वात कोणत्या ?
उरलाय धर्म आता धर्मात कोणत्या ?
का घरे दिसतात आता छत्र नसल्यासारखी
वादळाने कोणत्या वाहून नेली माणसे
गतकाळ सांगतो मग कैसी मिळेल मुक्ती
माझेच रक्त जर का माझ्या ऋणात नाही
नाना बेरगुडे याचे हे काही शेर. नाना बेरगुडे हा अपंग गझलकार. जन्मतः तो अपंग होता. उत्साह मात्र प्रचंड होता. आपण आपल्यालाच बोझ आहोत असं त्यांना नेहमी वाटायचं. पण त्याचा मित्र परिवार खूप मोठा व आधार देणारा होता. प्रत्येक वेळी त्याला उचलून घ्यावे लागे. सरपटत जात असे. एक व्हील चेअर होती. त्यात बसवून गावभर मित्र फिरवून आणायचे. आपण अपंग आहोत, आपल्याला हालचाल करता येत नाही, परस्वाधिन सगळ आहे. त्यातून तो उदास होई. कधी कधी आत्महत्या करावी वाटायची पण ती करायला जी हालचाल करावी लागते ती ही पराधीन असल्याने सतत दुःखी राहायचा. शिक्षण चालू होत. मित्र कॉलेजला घेवून जायचे. मुलीच्या प्रेमात पडायचं. पण त्याच्या कोण प्रेमात पडणार? विरहाने कविता लिहिली. नंतर सशक्त गझल लिहिली. मी पुण्याच्या सुरेश वैराळकर यांनी स्थापन केलेल्या सुरेश भट गझलमंचचा पदाधिकारी झालो. तिथे त्याची गझल सादर व्हावी असे त्याच्या मित्रांना वाटले. पण त्याला पुण्यात घेवून येणे खर्चिक आणि चार पाच जण लागायचे. मित्र हारले नाहीत. त्यानी त्याची गझल पुण्यात रसिकांना ऐकवलीच. त्याला एकाकी वाटू नये म्हणून मानवतचे त्याचे मित्र कुणाल गायकवाड, मयूर कुलकर्णी, हर्षल भालेराव, पवन मोकाशी सिद्धू राऊत यांनी त्याला आनंदवन दाखवले. तिथले अपंग, अंध, मूकबधिर, जर्जर दुःखी कुष्ठरोगी कसे राहतात हे दाखवले. त्याच्यात जिद्द निर्माण केली. नानाला कंबरेपासून खाली हालचाल होत नसे. सगळी सेवा मित्र करायचे. सोमनाथ श्रम शिबिरात त्याला सात दिवस त्याचे हे मित्र घेवून यायचे. तिथे त्याची व माझी मैत्री आली. अपंग व त्यात कवी असल्याने तो चांगला मित्र झाला. त्याच्या मित्रांची इच्छा होती त्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्याची कविता व्हावी. त्याला गझलेसाठी अनेक व्यासपीठे मिळाली. सोलापूर, परभणी आदी ठिकाणी त्याच्या कविता वाचल्या गेल्या. अंबाजोगाईला पाहिला मराठी गझल मूशायरा घेतला त्यात त्याला मी बोलावले. प्रचंड दाद घेवून गेला. नंतर सतीश दराडे यांनी त्याची गझल आणखी सशक्त करण्यास मदत केली. त्याला गझलकार भरपूर मित्र झाले.
गतकाळ सांगतो मग कैसी मिळेल मुक्ती
माझेच रक्त जर का माझ्या ऋणात नाही
सर्व दु:खांवर उतारा ठेवतो
मी जिभेखाली निखारा ठेवतो
मोरही स्वार्थी निघाला केवढा
खोलण्यापुरता पिसारा ठेवतो
सांग, पटण्यासारखे कारण मला
मी कुठे कानात वारा ठेवतो
ज्यास नसते कावदानाची भिती
तोच उघड्यावर पसारा ठेवतो
ईश्वरा, त्याला भुकेने मार तू
जो लुळ्या चोचीत चारा ठेवतो
असे टोकदार शेर तो लिहू लागला. सगळा आनंद त्याला माझ्यासह सर्व मित्रांनी दिला. पण आपण घरी कुणाच्यातरी विसबून आहोत ही खंत वाटायची. अनेक मित्र व त्याने जमविलेल्या मैत्रिणी त्याला आधार द्यायचे. पण नंतर नंतर खूपच खचला. एक दिवस स्नान करताना व्हीलचेअर सह पडला. दुखापत झाली. तरीही मित्रांनी व कुटुंबांनी त्याला खूप आधार दिला. पण मनातून खचल्याने त्याने आपले प्राण जगाच्या हवाली केला.
त्याला जावून सहा वर्षे झाली. गझलेत त्याने नाव कमविले. त्याला होईल तेवढा. आधार दिला. मी तर फोनवर सतत बोलायचो. नंतर ती आमची सवय झाली. त्याला आनंदवन दाखविले, अपंग, अंध व आपल्याला दुःखी वाटणारे लोक कसे आनंदी जगतात हे दाखवून त्याची उर्मी वाढवण्याचा सर्वांचा प्रयत्न फासला. त्याच्या अनेक कविता गझल प्रसिद्ध झाल्या. कधी त्याने आपल्या अपंगत्वावर कविता वा गझल व शेर लिहीला नाही. प्रेम आणि विरह हा त्याच्या काव्याचा आत्मा होता. महाराष्ट्रातील त्याच्या गझल लिहिणाऱ्या मित्रांनी त्याच्या नावाने गझल पुरस्कार ठेवला आहे. कोविड मुळे दोन वर्षं झाली नाही. पहिला पुरस्कारही माझ्या हस्ते मानवतला दिला. नंतर ही ते दिले. आठ तारखेला तुळजापूर मसाप शाखेच्या सहकर्याने दोन वर्षाचे पुरस्कार वितरित केले जात आहेत. पुन्हा माझ्याच हस्ते. नाना बेरगुडे एक प्रतिभा घेवून जमलेला कलावंत. पण स्वतःच दुःख पचवत जगला. हारला मात्र असाह्य जगण्याला. त्याचे सगळे मित्र त्याची आठवण रहावी म्हणून आजही धडपडत असतात. कुणाल, मयूर, दास, सतीश, पवन, निशब्द असे माझ्यासह सगळेच.
जगरहाटीचा असावा कौल हा
एकटेपण घेवुनी येतो घरी
तांबडा होवून विझतो कोळसा
लालसा इतकी नसावी चाबरी
असं लिहिणारा नाना बेरगुडे. शेवटच्या काही वर्षात नाना काव्यमय व गझलमय एकरूप झाला. त्याच्या प्रतिभेला नवे नवे धुमारे फुटत होते. आणि अचानक एक दिवस त्याच्या मृत्यूची बातमी आली. माझ्यासह मित्रांच्या काळजाचा ठोका चुकला. हळहळ करण्यापलीकडे कांहीच नव्हतं. त्याची गझल एका उंचीवर जात होती आणि नाना त्याच उंचीवरून निघून गेला. त्याचे कांही शेर
पाखरा हे योग्य नाही पाखराने सांगणे
पिंजरा विरघळत नसतो पंख फडफडल्यामुळे
घास शेवटचा खुबीने टाळला असताच मी
रांगता आले न आई पाय आखडल्यामुळे
सातजन्माचे सुनेपण लागते
मग कुठे, जन्मास येते शायरी
असे सात जन्मचे सुनेपन जगणारा नाना बेरगुडे याचे स्मरण होतं राहावे म्हणून त्याच्या नावाने गझलेसाठी दरवर्षी पुरस्कार दिला जातो. तुळजापूर येथे नाना बेरगुडे स्मृती समिती व मसाप तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माझ्या हस्ते दोन गझलकार अल्पना देशमुख आणि मारुती मानेमोड यांना पुरस्कार दिले. ही संधी म्हणजे नाना आम्हा सर्वांच्या मनात कायम आहे हीच शास्वती देणार क्षण.
-दगडू लोमटे, अंबाजोगाई
9823009512