नांदेड: परमेश्वर व जनतेचा आशीर्वाद पाठीशी आहे त्यामुळेच कोरोनाच्या संसर्गातून बरे झाल्याची भावना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर आज गुरुवारी खासदार विमानाने नांदेडला येत आहेत. कोणीही भेटण्यासाठी येऊ नये, गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
खा. प्रतापराव पाटील यांना वाढदिवसाच्या दुसऱ्याचं दिवशी म्हणजे 3 ऑगस्ट रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. कोरोना काळात गेली साडेचार महिने खा. चिखलीकर हे अविरतपणे लोकांच्या मदतीला धावून गेले. एवढेच नव्हे तर कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचार सुरू असताना रुग्णालयातूनही त्यांनी जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या.
कोरोनाचा संसर्ग माझ्या एकट्यालाच झाला नाही तर तो देशात, राज्यात अनेक मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी सामान्य जनता यांना झाला आहे. मी या संसर्गातून आता चांगला झालो आहे माझी प्रकृती ठणठणीत झाली असून आज गुरुवारी विमाने नांदेडला येत आहे. तेव्हा कार्यकर्ते, आप्तस्वकीय, मित्रपरिवार यांनी भेटण्यासाठी येऊ नये गर्दी करू नये. कोरोनाच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे व भेटीसाठी सध्यातरी येऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.