नांदेड: नवीन वर्षात नांदेड-पुणे द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेस पुणे स्टेशन ऐवजी हडपसर पर्यंत धावणार आहे. या गाडीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे जालना रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील. गाडी संख्या १२७३०/ १२७२९ नांदेड-पुणे द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेस च्या वेळेत, स्थानकात (टर्मिनल) आणि रचनेत बदल करण्याचे रेल्वे बोर्डाने मान्य केले आहे.
हा बदल दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकातून निघणाऱ्या गाडी ला आणि दिनांक 3 जानेवारी, २०२२ रोजी हडपसर येथून सुटणाऱ्या गाडी ला लागू होईल. तसेच ही गाडी आता पुणे स्थानका ऐवजी हडपसर रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि तेथ पर्यंतच पोहोचेल. या गाडीचे टर्मिनल पुणे ऐवजी हडपसर असे करण्यात आले आहे. ही गाडी नवीन वर्षात नांदेड-हडपसर-नांदेड अशी धावेल.
या गाडीला दिनांक २ जानेवारी २०२२ ला रावसाहेब दानवे हे जालना रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील. या गाडीच्या रचनेत बदल करून तिला एल.एच.बी. कोचेस लावण्यात आली आहेत. २ जानेवारी पासून या गाडीत २० डब्बे असतील.
1.गाडी संख्या १२७३० ही गाडी २ जानेवारी पासून, हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सप्ताहातून दोन दिवस रविवारी आणि मंगळवारी सायंकाळी ६.३० मिनिटांनी सुटेल. जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे हडपसर येथे सकाळी ०६.५५ वाजता पोहोचेल.
2.गाडी संख्या १२७२९ ही गाडी 3 जानेवारी पासून, हडपसर रेल्वे स्थानकावरून सप्ताहातून दोन दिवस सोमवारी आणि बुधवारी रात्री १०.०० वाजता निघेल आणि औरंगाबाद, जालना मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे सकाळी १०.०० वाजता पोहोचेल.