पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिका येथे करण्यात आले. या पुतळ्याची उंची सुमारे ९.५ फूट इतकी आहे.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन स्वागत केले.
यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, खासदार छ्त्रपती उदयनराजे भोसले, महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
सिम्बॉयसिस’ सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन: देशात विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या सुधारणा नवयुवकांसाठी संधी असून नवीन भारताचे नेतृत्व युवकांना करायचे आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
सिम्बॉयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ येथे ‘सिम्बॉयोसिस’च्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवाचे उद्घाटन प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ‘सिम्बॉयोसिस आरोग्य धाम’चे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ‘सिम्बॉयोसिस’चे संस्थापक आणि अध्यक्ष प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.
संस्थेत सर्व राज्यातील विद्यार्थ्यांसोबतच जगातील ८५ देशातील विद्यार्थी शिकत असल्याचे समजून आनंद वाटल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम’ या विचारधारेचे ही संस्था प्रतिनिधित्व करत आहे. संस्था भारताच्या प्राचीन वारशाचे आधुनिक रुपात जतन करत आहे ही आनंदाची बाब आहे. संस्थेचे विद्यार्थी अशा पिढीचे प्रतिनिधित्व करत आहेत ज्यांच्यापुढे अमर्याद संधी उपलब्ध आहेत.
आपला देश जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असून ‘स्टार्टअप इकोसिस्टीम’चे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे हब बनला आहे. ‘स्टार्टअप इंडिया’, ‘स्ट्रेंथन इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ अशा मोहिमा विद्यार्थ्यांच्या आकांक्षाना मूर्त रूप देत आहेत. आजचा भारत नवे सृजन करत आहे, सुधारणा करत आहे तसेच पूर्ण विश्वाला प्रभावित करत आहे, असेही प्रधानमंत्री म्हणाले.