औरंगाबाद: संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली यांचे मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर रविवार, 14 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण व नौसेना अकादमी परीक्षा सत्र-I सकाळी 10:00 ते 12:30 व सत्र-II दुपारी 02:00 ते 04.30 या कालावधीत आयोजीत करण्यात आली आहे. तसेच सीडीएस-ll परीक्षा-2021 परीक्षा सत्र –l सकाळी-09.00 ते 11.00 सत्र –ll 12.00 ते 02.00 व सत्र –lll दुपारी -03.00 ते 05.00 या कालावधीत सदरील परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे या कालावधीत एकूण- 17 उपकेंद्रावर परीक्षा होणार आहे. तथापी 17 महाविदयालयापैकी उपकेंद्र क्रमांक 01 ते 04 हे सीडीएस ll या परीक्षेकरिता निश्चित करण्यात आलेले असून व त्यापैकी उपकेंद्र क्रमांक 01 व 02 वर तीन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. उपकेंद्र क्रमांक 05 ते 17 हे एन.डी.ए परीक्षेसाठी निश्चित करण्यात आले आहे.
सदरील एकूण परिक्षेसाठी 5434 उमेदवारांना प्रवेश देण्यात आलेला आहे. विषयांकीत परीक्षेच्या कामासाठी एकूण 699 अधिकारी/ कर्मचारी यांची नियूक्ती करण्यात आली आहे. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र व स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करते वेळी नोंदविण्यात आलेला ओळखीच्या पुराव्याची मुळ प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षामध्ये पेपर सुरू होण्याच्या एक तास आगोदर प्रवेश देण्यात येईल. परीक्षा उपकेंद्रावर उमेदवारांना त्यांचे मुळ प्रवेश प्रमाणपत्र ,काळया शाईचे बॉल पॉइंट पेन, ओळखपत्र, मास्क, सॉनिटायझर बॉटल, पिण्याचे पाण्याची पारदर्शक बॉटल व साधे मनगटी घड्याळ याव्यतीरीक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तू परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही. उमेदवार त्यांच्या सोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटुथ, कॅमेराफोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेवून जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत: च्या जबाबदारीवर परीक्षा केद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परीक्षांकरिता बंदी घालण्यात येईल. आयोगाकडून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज प्रणालीव्दारे वितरित करण्यात आलेले प्रवेश प्रमाणपत्र हे त्यांच्यासाठी प्रवासाचा पास म्हणून ग्राहय धरण्यात येईल. परीक्षेसाठी स्वतंत्र ई-पास अथवा इतर कोणत्याही परवानगीची आवश्यकता असणार नाही. तथापि, प्रवेश प्रमाणपत्रासोबत उमेदवाराने ओळखीच्या पुराव्याकरिता आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र अथवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक जवळ बाळगणे व तसे तपासणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य राहिल.