नांदेड: कोरोनानंतर निर्माण झालेल्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी यंत्रास विरोध करून चालणार नाही. यापुढे कामगारांना उपलब्ध रोजगाराचे समन्यायी वाटप करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर यांनी केले.
नांदेड येथील पीपल्स कॉलेजच्या वतीने पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय वेबीनार घेण्यात आले. यामध्ये “कोरोनानंतरची आर्थिक क्षेत्रासमोरील आव्हाने व उपाय” या विषयावर ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ एच.एम. देसरडा यांनीही सहभाग नोंदवला.
यमाजी मालकर म्हणाले, कोरोनानंतर आपल्या क्षमता वाढविण्यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण, उद्योग व व्यवसायाचे विकेंद्रीकरण व सरकारचे उत्पन्न वाढविणे व जनतेची क्रयशक्ती वाढविण्याचे कार्य करणे आवश्यक आहे, तरच अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल व रोजगारात वाढ होईल.
कोरोनानंतरच्या परिस्थितीस भौतिक विकास जबाबदार असणार आहे. पॅकेजऐवजी जनतेच्या मूलभूत गरजांची हमी घेऊन सामाजिक सुरक्षा द्या, असेही मालकर म्हणाले.
डॉ. एच. एम. देसरडा म्हणाले, उत्पन्न कराबरोबरच संपत्तीकर व वारसाकर आकारण्यात यावा. सरकारचे उत्पन्न वाढल्याशिवाय लोककल्याण कार्य करणे अशक्य आहे.
नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे म्हणाले, विज्ञान व तंत्रज्ञानाने प्रगती करूनही कोरोनावर अद्याप कोणतीही लस शोधण्यात यश आले नाही. त्यामुळे निसर्गाशी अनुकूल जगणे आवश्यक आहे. संस्थेच्या सचिव प्रा. श्यामल पत्की म्हणाल्या की, या परिस्थितीत सर्व भारतीयांनी सहनशीलता व क्षमता सिद्ध केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
चर्चासत्राचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर.एम. जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बी.डी. कोंपलवार यांनी केले. तर आभार डॉ. सचिन पवार यांनी मानले. या वेबीनारसाठी राज्यस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, उत्तरप्रदेश येथील प्राध्यापक व महाराष्ट्रातील ८०० हून अधिक प्राध्यापक, विद्यार्थीं यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. सी.के. हरनावळे, डॉ. दत्ता यादव, डॉ. मोहन रोडे, डॉ. आर.डी. डोईफोडे, प्रा. विजू जाधव, राहुल देशमुख, डॉ. विशाल पतंगे, डॉ. पंढरी गड्डपवार, राहुल गवारे यांनी पुढाकार घेतला.
सरजी आपले विचार अत्यंत अभ्यासपूर्ण असून शासन-प्रशासन आणि उद्योजक यांनी याची अंमलबजावणी केली तर भावी उद्भवणारे प्रश्न आणि समस्या सोडवण्यास मदत होईल.