मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात आणि नंतर रात्री तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. निसर्ग हे चक्रीवादळ तशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने 3 जून रोजी दुपारी अलिबाग पार करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून
महाराष्ट्रात एनडीआरएफच्या 10 तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत 3, रायगड आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी 2 तर ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी 1 तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती पुणे एनडीआरएफचे कमांडर अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. एनडीआरएफच्या तुकड्यांनी या प्रदेशाची पाहणी करून या चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानाबाबत लोकांना माहिती दिली आहे.
भारतीय तटरक्षक दलाची जहाजे, विमाने आणि किनाऱ्यावरची ठाणी, व्यापारी जहाजे आणि मच्छिमारांना, प्रतिकूल हवामानाबाबत सातत्याने इशारा जारी करत आहेत. जिल्हा प्रशासन गावांची पाहणी करत असून कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवणार आहे. मुंबईत पालिका प्रशासनाने, मुसळधार पावसाने पाणी भरल्यास त्यासंदर्भात आराखडा आखला आहे. बृहन्मुंबई महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अतिदक्ष ठेवला आहे. मुंबईतल्या सर्व 24 प्रभागातल्या अधिकाऱ्यांनी, सखल भाग आणि संभाव्य धोकादायक भाग निश्चित करून तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
खबरदारीचा उपाय म्हणून राज्य प्रशासनाने बीकेसीमधल्या तात्पुरत्या सोयीसाठीच्या निवाऱ्यातून लक्षणे नसलेल्या 150 कोविड रुग्णांना वरळी इथल्या आच्छादित छप्पर असलेल्या सुविधेत हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार निसर्ग चक्रीवादळ गोव्यापासून 280 किमी वर कमी दाबाचा पट्टा म्हणून आहे. किनारी ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बांग्लादेश यांना तडाखा देणाऱ्या अमफन चक्रीवादळाइतकी निसर्गची तीव्रता राहणार नसली तरी भारतीय हवामान खात्याने मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा आणि समुद्र खवळलेला राहील असा इशारा दिला आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ किनारी प्रशासन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे.