# निसर्ग चक्रीवादळ: मुंबईचा धोका टळला; जिवितहानी नाही.

 

मुंबई: निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईला असलेला धोका टळला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. असे असले तरी दक्षतेचा इशारा मात्र कायम आहे. या चक्रीवादळाचा फटका मुंबईसह पुण्यालाही बसला. आता हे चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकले आहे.

पुण्यासह मुंबईत सकाळपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. पण कुठेही जिवितहानी झाली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील चौपाट्यांवर जीवरक्षक दल तैनात करण्यात आले होते.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाडे पडली, चारजण जखमी:  निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात 4 जण जखमी झाले. मात्र, जिवितहानी नाही. तसेच नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानीबाबत 2 दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

हे चक्रीवादळ जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मंडणगड आणि दापोली तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती तेथील विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे असे त्यांनी सांगितले.

भरकटलेले जहाज किनाऱ्यावर आणले:  रत्नागिरीत डिझेल वाहतूक करणारे एक जहाज भगवती बंदरात होते. वाऱ्याच्या वेगाने जहाजाचा अँकर तुटल्याने ते भरकटत पांढरा समुद्रापर्यंत आले. ते किनाऱ्याला आणले असून यावरील 13 खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश आले आहे. हे खलाशी डिझेल पुरवठा करून परतण्यासाठी निघाले, परंतु वादळाच्या सूचनेमुळे थांबले होते. या प्रवाशांमध्ये 10 भारतीय असून 3 परदेशी आहेत. त्यामुळे या सर्वांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब घेतले जातील, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे सामंत म्हणाले. हे जहाज खडकावर आदळून त्याला छिद्र पडल्याने वापरून झालेले इंजिन ऑइल सांडले, परंतु धोका नाही. बोट महिनाभर येथेच राहील असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *