औरंगाबाद: दौलताबाद जवळील शरणापूरच्या भांगसी माता गड येथे सोमवार, 26 सप्टेंबर पासून श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सव, जपानुष्ठानचे आयोजन केले आहे. नित्य नियम विधी, आरती, प्रवचन, योगासने आदींसह विविध कार्यक्रम मंगळवार, चार ऑक्टोबरपर्यंत यामध्ये होतील. उत्सवाची सांगता चार ऑक्टोबरला मिरवणूक, प्रवचन व महाप्रसादाने होईल. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री स्वामी परमानंद गिरी महाराज आश्रमाने केले आहे.
जपानुष्ठाना व्यतिरिक्त दररोज पहाटे पाच ते सातपर्यंत विधी, आरती, प्रवचन व सायंकाळी सात वाजता परमानंद गिरी यांचे प्रवचन आश्रमात होईल. अनुष्ठानास बसणाऱ्या भाविकांनी आवश्यक साहित्यासह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी 9823447607, 9923494901 किंवा 9422290333 यावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
असा आहे भांगसी माता गड: शरणापुरातील डोंगरावर भांगसी माता मंदिर आहे. नवरात्रात गडावर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गडाच्या शिखरावर म्हणजेच जमिनीपासून हजार फुट उंचीवर सासू सुनेचे कुंड आहे. या कुंडात बारमाही पाणी असते. “नाही केली भांगसी तर देवा काय सांगशी” असे भाविक म्हणतात. शिवाय वर्षातून एकदा भांगसी मातेच्या दर्शनासाठी पायी येतात. पायऱ्यांवरील शेड, गडाच्या पायथ्याशी हेमाडपंथी पशुपतयेश्वर मंदिर निर्माण कार्य, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आदी कामे गडावर प्रगतीपथावर आहेत. पायथ्याशी सुमारे ५०० मुलांचे निवासी गुरुकुल आहे. विद्यार्थ्यांना गाईचे दूध मिळावे, यासाठी गोशाळा आहे. गुरू परंपरेतील संस्काराबरोबरच वैज्ञानिक शिक्षण गुरूकुलात विद्यार्थ्यांना देण्यात येते. गडावर विजेची व्यवस्था, मातेच्या गाभाऱ्यावर भाविकांच्या योगदानातून मंदिर, सभामंडपाची निर्मिती झाली आहे.